मोरीला नाही बोळा; बोगदा रिकामा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:35 IST2021-04-14T04:35:13+5:302021-04-14T04:35:13+5:30
कऱ्हाड : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ‘ब्लॅक स्पॉट’ कमी नाहीत; पण त्या ठिकाणी उपाययोजना करण्याकडे ‘रस्ते विकास’चे दुर्लक्ष आहे. कऱ्हाडातील ...

मोरीला नाही बोळा; बोगदा रिकामा !
कऱ्हाड : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ‘ब्लॅक स्पॉट’ कमी नाहीत; पण त्या ठिकाणी उपाययोजना करण्याकडे ‘रस्ते विकास’चे दुर्लक्ष आहे. कऱ्हाडातील कोयना मोरीही ‘ब्लॅक स्पॉट’च्या यादीत आहे. ही मोरी बंद करण्याची लेखी मागणी पोलिसांनीही केली आहे. मात्र, ‘रस्ते विकास’ने त्याकडे कानाडोळा केल्याने या ठिकाणचा धोका अद्यापही कायम आहे.
कऱ्हाडात कोल्हापूर नाक्यानजीक उड्डाण पुलाखाली कोयना मोरी आहे. पंकज हॉटेलकडून तसेच शहरातून कऱ्हाड हॉस्पिटलकडून आलेली अनेक वाहने या मोरीतून पलीकडे जाऊन कोल्हापूर-सातारा लेनवर पोहोचतात. मात्र, मोरी अरुंद असल्यामुळे मोरीतून वाहनाचा अर्धा भाग बाहेर आल्याशिवाय चालकाला कोल्हापूर नाक्याकडून आलेले वाहन दिसत नाही. तसेच या ठिकाणी महामार्गावर येताना चढण आहे. कोल्हापूरच्या बाजूकडून येणारी भरधाव वाहने आणि मोरीतील रस्त्याला असलेली चढण यामुळे या ठिकाणी अपघात होतात.
कोयना मोरीतून बाहेर पडणाऱ्या वाहनांमुळे या ठिकाणी अपघात होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ३ फेब्रुवारी रोजी कऱ्हाड वाहतूक शाखेच्या साहाय्यक निरीक्षक सरोजिनी पाटील यांनी सुचविलेल्या पर्यायानुसार प्रांताधिकारी उत्तम दिघे, उपअधीक्षक रणजित पाटील, मुख्याधिकारी रमाकांत डाके, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सगरे, पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांनी पाहणी करून मोरी बंद करण्याचा निर्णय घेतला. यावर कोणाला काही हरकत असल्यास संबंधितांनी सात दिवसांत वाहतूक शाखेत म्हणणे सादर करण्याचे आवाहन त्यावेळी करण्यात आले होते. मात्र, मोरी बंद करण्यास कोणाची काहीही हरकत नसल्यामुळे कोणीही म्हणणे दिले नाही. त्यानंतर वाहतूक शाखेने रस्ते विकासकडे मोरी बंद करण्याबाबत पत्रव्यवहार केला. मात्र, अद्यापही रस्ते विकासने त्याकडे लक्ष दिलेले नाही. परिणामी, या ठिकाणचा धोका अद्यापही कायम आहे.
- चौकट (फोटो : १३केआरडी०२)
आरसा... असून अडचण, नसून खोळंबा!
कोल्हापूर नाक्यानजीकच्या या मोरीत सामाजिक बांधीलकीतून काहीजणांनी आरसा बसविला होता. मोरीतून रस्ता ओलांडणाऱ्या वाहनांच्या चालकांना कोल्हापूरच्या बाजूकडून येणारी वाहने दिसावीत, हा त्यामागचा उद्देश होता. मात्र, रस्त्याला चढण असल्यामुळे या आरशाचाही म्हणावा तेवढा उपयोग होत नव्हता. हा आरसा ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशा स्थितीत होता.
- चौकट
‘ब्लॅक स्पॉट’ क्रमांक ६८२
कोल्हापूर नाक्यावरील मोरीचे हे ठिकाण ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून यापूर्वीच घोषित करण्यात आले असून त्याची नोंद ६८२ क्रमांकावर घेण्यात आली आहे.
- चौकट
वर्षात २० अपघात
कोयना मोरीतून अचानक वाहने बाहेर पडत असल्यामुळे कोल्हापूर नाक्याकडून येणाऱ्या भरधाव वाहनांचा वेग चालकांना नियंत्रित करता येत नाही. परिणामी, येथे लहानमोठे अपघात घडतात. गत वर्षभरात या ठिकाणी २० अपघात झाल्याचे वाहतूक शाखेचे म्हणणे आहे.
- कोट (फोटो : १३सरोजिनी पाटील)
कोयना मोरी हे ठिकाण अपघाती आहे. ते बंद करण्याबाबत हरकती मागविल्या होत्या. कोणाचीही हरकत नसल्यामुळे रस्ते विकास महामंडळाशी पत्रव्यवहार करून मोरी बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, अद्याप रस्ते विकासकडून त्याबाबत कार्यवाही झालेली नाही. आम्ही त्यासाठी पाठपुरावा करीत आहोत.
- सरोजिनी पाटील
साहाय्यक पोलीस निरीक्षक, वाहतूक
फोटो : १३केआरडी०१
कॅप्शन : कऱ्हाडात कोल्हापूर नाक्यानजीक असलेली कोयना मोरी ब्लॅक स्पॉट असूनही ती बंद करण्याकडे रस्ते विकास महामंडळाचे दुर्लक्ष आहे.