साबळेवाडीची फुलं चमकली मुंबईत!

By Admin | Updated: October 13, 2015 00:21 IST2015-10-12T21:03:26+5:302015-10-13T00:21:59+5:30

सेंद्रिय शेतीची कमाल : पन्नास गुंठ्यात मिळविले अडीच लाखांचे विक्रमी उत्पन्न

Sawalwadi flowers shine in Mumbai! | साबळेवाडीची फुलं चमकली मुंबईत!

साबळेवाडीची फुलं चमकली मुंबईत!

नवरात्रोत्सवात झेंडूला विशेष महत्त्व असते. साबळेवाडी, ता. सातारा येथील शेतकरी दत्तात्रय जाधव यांनी नगदी पिकांकडे मोर्चा वळविला आणि विक्रमी उत्पन्न घेतले. पन्नास गुंठ्यांमध्ये जाधव यांनी तीन टन झेंडूचे उत्पन्न मिळविले आहे. विशेष म्हणजे, त्यांची ही सगळी फुले दसऱ्याच्या आधी मुंबईच्या बाजारपेठेत दाखल होत आहेत.सातारा तालुक्यातील साबळेवाडी हे छोटेसं गाव. या गावातील दत्तात्रय जाधव यांना प्रयोगशील शेती करण्यामध्ये भलताच रस आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून शेतीत नवनवीन प्रयोग करण्यासाठी ते कायम तयार असतात. यावर्षी त्यांनी झेंडूची शेती करण्याचे नियोजित केले. त्यानुसार त्यांनी पन्नास गुंठ्यांत ‘अ‍ॅरोगोल्ड आणि लाल भगवती’ या दोन जातींच्या फुलांच्या रोपांची लागण केली. सेंद्रिय खतांचा वापर करण्याचा पुरस्कार करणारे जाधव यांनी हाच नियम झेंडू शेतातही लावला. त्यामुळे फुलांची नैसर्गिक वाढ झाली आणि अन्य फुलांच्या तुलनेत ही फुले अधिक तजेलदार आणि उठावदार झाली.
पन्नास गुंठ्यांमध्ये जाधव यांनी सुमारे तीन टन फुलांचे उत्पादन घेतले आहे. कुटुंबीयांबरोबर शेती करणाऱ्या जाधव यांच्या फुलांना ऐंशी रुपये किलोचा भाव मिळाला आहे. त्या हिशेबाने पन्नास गुंठ्यांत त्यांनी अडीच लाखांचे उत्पन्न घेतले आहे.
जाधव यांनी साडेसात हजार रुपयांची रोपे रोपवाटिकेतून आणली. त्यामध्ये चार हजार ‘अ‍ॅरोगोल्ड’ जातीची आणि साडेतीन हजार लाल भगवती जातीच्या रोपांच्या लागण केली. दसरा आणि दिवाळी या दोन्ही सणांमध्ये या फुलांची तोडणी येईल, या बेताने अडीच महिन्यांपूर्वी यांनी रोपाची लागण केली. सुमारे बारा महिला व पुरुषांच्या मदतीने या फुलांची तोडणी केली जाते. सुमारे पन्नास हजारांची गुंतवूणक करून अडीच लाखांचे उत्पन्न घेऊन जाधव यांनी परिसरातील शेतकऱ्यांपुढे आदर्श ठेवला आहे.
सातारा तालुक्यातील शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणावर नगदी पिकांकडे वळू लागले आहेत. कमी खर्चात अधिक उत्पन्न घेण्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत आहे.
कष्टाचं चिज झालं..
सेंद्रिय शेती करण्याकडे मी कायम भर दिला आहे. शेतीत वेगवेगळे प्रयोग करणे मला आवडते. पिवळे अ‍ॅरोगोल्ड आणि लाल भगवती यांचे विक्रमी उत्पन्न यंदा मी घेतले आहे. उत्कृष्ट प्रतीचे बियाणे आणि सेंद्रिय खतांमुळे फुलांची परतवारी चांगली मिळाली. त्यामुळे ही फुले दसऱ्याच्या दोन दिवस आधी मुंबईच्या बाजारपेठेत जाणार आहेत.
- दत्तात्रय जाधव, साबळेवाडी, ता. सातारा.






साई सावंत

Web Title: Sawalwadi flowers shine in Mumbai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.