सावित्रीच्या लेकी ठरल्या रणरागिणी
By Admin | Updated: January 3, 2015 00:01 IST2015-01-02T22:43:02+5:302015-01-03T00:01:01+5:30
सातारा : सामाजिक कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने आज होणार गौरव

सावित्रीच्या लेकी ठरल्या रणरागिणी
सातारा : स्त्री शिक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची उद्या (शनिवारी) जयंती. यानिमित्ताने सातारा जिल्हा परिसरात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रणरागिणींचा शनिवारी सातारा येथे ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. अशा रणरागिणींच्या कार्यावर ‘लोकमत’ने टाकलेला एक दृष्टिक्षेप...
मुलांच्या हक्कासाठी आईचा संघर्ष सुरुच..!
सातारा : शिक्षिका होण्याचं पाहिलेलं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी तिनं लग्नानंतरही शिक्षण सुरू ठेवलं. संसार सुखाचा सुरू असताना अचानक तिच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचं निष्पन्न झालं. सासरच्यांनी झिडकारलं. ज्याच्यासोबत आयुष्याची दोरी बांधली त्यानंही आजार समजल्यावर नात्याचा दोर कापून टाकला अन् आपल्या दोन चिमुरड्यांची जबाबदारीही पित्यानं नाकारली. एका बाजूला मृत्यूशी झुंज अन् दुसऱ्या बाजूला आपल्या चिमुरड्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी लढणारी एक लढवैय्यी आई म्हणजे गीतांजली डिसले.
उंब्रज येथील एका सामान्य कुटुंबातील गीतांजली यांनी आपली कहाणी ‘लोकमत’जवळ कथन केली. खटाव तालुक्यातील राजापूर येथील सुरेश जयवंत डिसले यांच्याशी लग्न झालं. संसाराच्या वेलीवर दोन फुलं उमलली. शिकण्याची इच्छा असल्यामुळं लग्नानंतर माहेरी राहून २०१२ मध्ये डी.एड.ची पदवी मिळविली; पण आपली सून शिक्षिका होणार यापेक्षाही घरात एक पगार येणार, याचाच आनंद सासरच्यांना अधिक झाला होता.
एक दिवस अचानक तब्येत बिघडली म्हणून दवाखान्यात गेले. तिथे गेल्यानंतर माझ्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचं निष्पन्न झालं. पतीला कळवलं. सासरच्यांना सांगितलं. आजाराची माहिती दिली. उपचारासाठी मोठा खर्च येणार होता. पण, मी दवाखान्यात असताना सासरकडून कुणीही बघायला आले नाही. पतीनेही आधार काढून घेतला आहे. आपल्या आजारापेक्षाही मुलांचं भविष्य महत्त्वाचं समजून धैर्य एकवटून लढतेय मुलांच्या हक्कासाठी.
डबडबल्या डोळ्यांनी गीतांजली सांगत होत्या. सासरच्यांनी नातं तोडलं. पण, आई आणि भावानं मला अन् माझ्या लेकरांना जवळ केलं. माझ्या उपचारासाठी आईनं शेती विकली. ट्रॅक्टर विकला. भाऊ दुसऱ्याच्या दुकानात काम करून घर चालवितोय. मुलं शाळेत जातायेत. मुलगी ज्ञानेश्वरी सहावीत आणि मुलगा हर्षवर्धन तिसरीत शिकतोय. घरची परिस्थिती बिकट झालीय. उपाशीपोटी राहण्याची वेळ चिमुकल्यांवर आलीय.
मुलांची तरी
जबाबदारी घ्या
सासरी बागायत शेती आहे. वर्षाला आठ-दहा लाखांचं उत्पन्न मिळतं. माझी नाही, निदान मुलांची तरी जबाबदारी घ्या, अशा विनवण्या करूनही पती आणि सासरचे लोक ऐकत नाहीत. ‘तुझा आमच्याशी संबंध नाही. तू इकडे यायचे नाहीस,’ असे बोलून जबाबदारी टाळतायेत. पण, मुलांना त्यांचा हक्क मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. माझ्या या लढाईत अॅड. वर्षा देशपांडे यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे.
पुस्तकप्रेमानं बनविलं ग्रंथपाल
सातारा : एक वाचक म्हणून ज्ञानभांडारातील अक्षरमोती वेचता-वेचता त्या कधी ज्ञानरूपी खजिन्याच्या खजिनदार झाल्या, हे त्यांनाही कळले नाही. पुस्तकांच्या सान्निध्यात त्या एवढ्या रममाण झाल्या की, पुस्तकप्रेमानं त्यांना शिवछत्रपती वाचनालयाच्या ग्रंथपालपदी नेऊन ठेवलं. असं हे पुस्तकवेडं व्यक्तिमत्त्व म्हणजे नंदा जाधव.
शिवछत्रपती वाचनालयाच्या ग्रंथपाल नंदा जाधव यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. या वाटचालीबद्दल त्यांनी सांगितले की, मला वाचनाची आवड लहानपणापासूनच. माझ्या कॉलनीतच हे ग्रंथालय असल्यामुळे पुस्तके घेण्यासाठी तेथे नियमित जाणे होते. ग्रंथपाल रजेवर जायचे तेव्हा ते मला काम सांभाळायला सांगायचे. त्यांचे आजारपण वाढत गेले तेव्हा कॉलनीतील लोकांनी ते काम मी करावे, असा आग्रह धरला. १९९२ मध्ये ग्रंथपालपदाचा डिप्लोमा केला अन् सहायक ग्रंथपाल म्हणून माझी अधिकृत नियुक्ती झाली.
नंदा जाधव यांनी वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी देणग्या मिळविणे, ग्रंथ मिळविणे, खरेदी करणे, सभासद वाढविणे यासाठी त्यांचे विशेष प्रयत्न आजही सुरू आहेत. १९९८ पासून त्या शासकीय ग्रंथपाल प्रमाणपत्र परीक्षा वर्गाच्या प्राचार्या म्हणूनही काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)
स्वयंपाकाची
जबाबदारी वाटून
समानतेच्या गप्पा विद्याविभूषित लोकं मारतात; पण संतोषी कांबळे यांच्या घरात समानता पावलोपावली पाहायला मिळते. सकाळी उठल्यापासून हे पती-पत्नी परस्परांना मदत करत घरातील एक-एक जबाबदारी पार पाडत असतात. सिमेंटमध्ये काम करताना पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हातांना चिरा पडतात. काहीवेळा तर त्यातून रक्तही येते. अशावेळी ज्याचे हात चांगले आहेत, त्याने स्वयंपाक करायचा आणि दुसऱ्याने घरातील अन्य काम आवरायची हा नियम आहे. पुस्तकाशी कुठेही गाठ न पडणाऱ्या या भन्नाट दाम्पत्याचे वर्तनही सुशिक्षितांना लाजवेल असेच आहे.
आमचे शिक्षण झाले नाही म्हणून आम्हाला गवंडीकाम करावे लागतेय. आमच्या मुलाला आम्ही शिकविण्याचा प्रयत्न करतोय; पण अभ्यासाची सक्ती नाही. त्याला शिकण्याची इच्छा असेल तर त्यानं शिकावं आणि साहेब व्हावं.
- संतोषी कांबळे, सातारा
संतोषी कांबळे यांनी काढली पुरुषांची मक्तेदारी मोडीत
सातारा : पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या क्षेत्रात महिला अत्यंत सुखदायक पद्धतीने कार्यरत असतात. शारीरिक श्रमाची कामे करण्यात पुरुषांच्या क्षेत्रातील मक्तेदारी मोडीत काढली ती संतोषी कांबळे यांनी! पुरुषांशिवाय गत्यंतर नाही, असे क्षेत्र म्हणून बांधकाम क्षेत्राकडे पाहिले जाते. त्या क्षेत्रात थापी आणि वळंबा घेऊन संतोषी उतरल्या. अत्यंत काटेकोरपणे काम करत त्यांनी अल्पावधित या क्षेत्रात कुशल कामगार म्हणून चांगले नाव कमावले आहे. कणखर कामगार, खंबीर पत्नी आणि प्रेमळ आई या तिन्ही भूमिका यशस्वीपणे पार पाडत आहेत.
मूळच्या बेळगाव (कर्नाटक) कडील संतोषी कांबळे विवाहानंतर साताऱ्यात आल्या. संतोषी यांचे वडीलही गवंडीकाम करायचे. ‘वडिलांचा वारसा चालविण्याची संधी मिळाली तर आपण तो चालवू,’ असं खासगीत संतोषी सांगत. संसाराचा गाडा ओढताना नवऱ्याची होणारी तारांबळ पाहून त्यांनीही डोक्यावर पाटी घेण्याचं ठरविलं. सकाळी लवकर आवरून नवऱ्याबरोबर कामावर जाण्याचं ठरवलं. पतीच्या हाताखाली काम करत-करत त्यांनी गवंडी होण्यासाठी आवश्यक खुबींवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. असेच एकदा कामावर गेल्यानंतर बिगारी अपुरे पडल्याचे त्यांना आढळले. ठेकेदाराला काम वेळेत पूर्ण करायचे होते; पण बिगाऱ्याविना त्यांचे काम अडणार होते. त्यावेळी संतोषी कांबळे पुढे आल्या आणि त्यांनी थापी आणि वळंबा हातात घेतला तो आज अखेर! संघर्ष करून आयुष्य जगणाऱ्या संतोषीला एक मुलगा आणि एक मुलगी. त्यांची मुलगी मतिमंद आहे. घरात मुलीला एकटे ठेवून येणं त्यांना नकोसे वाटते. म्हणूनच बऱ्याचदा तीही त्यांच्यासोबत कामावर असते.
याविषयी बोलताना त्या म्हणतात, ‘कोेणतेही काम नीटनेटकेपणाने करण्याचे कसब महिलांचे असते. गवंडी कामातही तसेच आहे. मला लिहिता, वाचता येत नाही; पण अनुभवाच्या जोरावर आता आकडे लक्षात येतात. कुठली गोष्ट किती अंतरावर आणि कशी पाहिजे हे लक्षात येते, त्यामुळे त्यानुसार करत जाते. पतीबरोबरच ठेकेदार आणि मालक यांचा विश्वास सार्थ ठरवू शकले, त्याचा आनंद आहे.’