सावित्रीबाई जयंतीदिनी उद्या दिग्गज नेते नायगावात
By Admin | Updated: January 2, 2015 00:07 IST2015-01-01T22:53:34+5:302015-01-02T00:07:35+5:30
विविध कार्यक्रम : गिरीश बापट, धनंजय मुंडे, विजय शिवतारे, छगन भुजबळ यांची उपस्थिती

सावित्रीबाई जयंतीदिनी उद्या दिग्गज नेते नायगावात
खंडाळा : आद्य स्त्री शिक्षिका व स्त्री शिक्षणाच्या जनक ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८४ व्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव नायगाव येथील सावित्रीबार्इंच्या राष्ट्रीय स्मारकास दि. ३ जानेवारी रोजी शासनाच्या वतीने अभिवादन केले जाते. यावेळी राज्याच्या मंत्रिमंडळातील विविध खात्यांचे मंत्री, जिल्हा परिषदेचे व पंचायत समितीचे पदाधिकारी उपस्थित राहतात. त्यामुळे सातारा जिल्हा परिषद व खंडाळा पंचायत समितीच्या वतीने कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे.
दि. ३ जानेवारी रोजी सकाळी साडेदहाला नायगाव येथे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट, सातारचे पालकमंत्री विजय शिवतारे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते जयंती सोहळा होणार आहे. यावेळी आमदार पृथ्वीराज चव्हाण, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार उदयनराजे भोसले, आमदार रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार पंकज भुजबळ, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शंभूराज देसाई, आमदार जयकुमार गोरे, आमदार दीपक चव्हाण, आमदार प्रभाकर घार्गे, आमदार आनंदराव पाटील, आमदार नरेंद्र पाटील, माजी आमदार मदन भोसले, कृष्णकांत कुदळे, बापूसो भुजबळ, प्रा. हरी नरके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय स्मारकाची सुशोभीकरण, बाहेरील बागेची नीटनेटकेपणा, शिल्पसृष्टीची सजावट या कामांसह कार्यक्रमाच्या ठिकाणी भव्य मंडप उभारणीचे काम जोरात सुरू आहे.
मान्यवरांच्या हेलिकॉप्टरसाठी हेलिपॅड उभारणे तसेच सुरक्षिततेविषयी सर्व उपाययोजना आखणे या कामांनी वेग घेतला आहे. तसेच राज्यातील विविध भागांतून येणाऱ्या अनुयायांसाठी गावकऱ्यांच्या वतीने चहापानाची व्यवस्था करण्याचे कामही सुरू आहे. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचायत समितीच्या वतीने प्रयत्न सुरू
आहेत. (प्रतिनिधी)
चेतनाभूमी नायगाव...
बहुजन समाजाच्या उत्कर्षासाठी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी आपले अखंड आयुष्य वेचले. नायगाव ही सावित्रीबार्इंची जन्मभूमी आहे. महाराष्ट्रातील तमाम महिलांसाठी प्रेरणा देणारी ही भूमी असल्याने नायगावचा उल्लेख चेतनाभूमी म्हणून होऊ लागला आहे.