साताऱ्यातही ‘पर्ल्स’ला टाळे !
By Admin | Updated: November 5, 2014 23:35 IST2014-11-05T21:56:44+5:302014-11-05T23:35:28+5:30
अधिकारी, एजंट गायब : जिल्हाभरातील ठेवीदारांमध्ये उडाली खळबळ

साताऱ्यातही ‘पर्ल्स’ला टाळे !
सातारा : मोलमजूर, नोकरदार यांच्यापासून मध्यमवर्गीयांपर्यंत लाखो गुंतवणूकदारांना भुरळ टाकणारी बहुचर्चित ‘पर्ल्स इंडिया कंपनीने’ गाशा गुंडळल्याचे सर्वश्रूत असतानाच साताऱ्यातही या ‘पर्ल्स’ कंपनीला टाळे लागले आहेत. एवढेच नव्हे तर या कंपनीतील व्यवहार गेल्या काही दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झाले असून, अधिकारी, एजंट गायब झाले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहे.
राधिका रस्त्यावरील एका इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर ‘पर्ल्स’चे कार्यालय आहे. दोन महिन्यांपासून हे कार्यालय बंद असून, बाहेर गुंतवणूकदारांसाठी सूचना फलक लावण्यात आला आहे. ‘सीबीआय’कडून थांबविलेली बँक खाती अद्याप सुरू झाली नसल्याने मुदत पूर्ण झालेल्या खातेदारांचे धनादेश मिळण्यासाठी मुख्य कार्यालयाकडे यादी पाठविण्यात आली आहे. ती यादी आल्यानंतर पैसे परत दिले जातील, असे त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. हा फलक पाहून गुंतवणूकदार परत जात आहेत. परंतु, त्या ठिकाणी स्थानिक अधिकाऱ्यांचे मोबाइल नंबर नसल्यामुळे गुंतवणूकदार आणखीनच संतप्त झाले आहेत. सातारा जिल्ह्यांमध्ये तीस हजारांहून अधिक ‘पर्ल्स’चे गुंतवणूकदार असल्याचे एका एजंटाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. साताऱ्यातील ‘पर्ल्स’ कंपनीमध्ये अनेकांनी पैसे गुंतवले आहेत. ते परत मिळण्याची शक्यता धुसर झाल्याने काही गुंतवणूकदारांनी एजंटांना धमकावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जुने कर्मचारी कार्यालयात येण्यास धजावत नाहीत. एकूण १३ कर्मचारी या कार्यालयात काम करत होते; परंतु आता ही कंपनीच डबघाईला आल्यामुळे नवीन कर्मचारी मिळणे त्यांना अवघड झाले आहे. या कंपनीमध्ये नेमकी किती रक्कम लोकांनी गुंतवली आहे, हे अद्याप समोर आले नाही. याबाबत एजंटही उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. (प्रतिनिधी)
‘पर्ल्स’ कंपनीमध्ये ज्यांनी पैसे गुंतवलेआहेत, ते निश्चित परत मिळतील. ‘सीबीआय’ने सर्व बँक खाती थांबविली आहेत. त्यामुळे सध्या सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. काही दिवसांतच पुन्हा कंपनी सुरू होईल.
- एन. बी. निकम, कार्यकारी व्यवस्थापक, पर्ल्स