साताऱ्याचे कर्नल महाडिक काश्मीर सीमेवर शहीद
By Admin | Updated: November 18, 2015 00:02 IST2015-11-17T22:00:39+5:302015-11-18T00:02:06+5:30
कर्नल महाडिक व इतर दोघा जखमींना हेलिकॉफ्टरने श्रीनगर येथे १५ कॉर्पस्च्या लष्करी कमांड इस्पितळात आणण्यात आले

साताऱ्याचे कर्नल महाडिक काश्मीर सीमेवर शहीद
श्रीनगर : सीमेच्या पलीकडून पाकिस्तानातून येऊन जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील जंगलात लपून बसलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या संशयित अतिरेक्यांना हुसकावून लावण्याच्या कारवाईत भारतीय लष्कराचे कर्नल संतोष महाडिक शहीद झाले. ४१ राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग आॅफिसर असलेले कर्नल महाडिक सातारा जिल्ह्यातील आहेत.
लष्करातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ३० व ३१ आॅक्टोबर दरम्यानच्या रात्री लष्कर-ए-तैयबा अतिरेक्यांची एक तुकडी कुपवाडा जिल्ह्यात हैहामा येथे सीमा ओलांडून भारतात घुसली होती. परंतु पाऊस व वर्फवृष्टीमुळे हे अतिरेकी जंगलातच अडकून पडले होते. या अतिरेक्यांना जंगलातून हुसकावून लावण्याची मोहीम लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सची तुकडी व काश्मिरच्या विशेष पोलिस दलाने १३ नोव्हेंबरपासून हाती घेतली होती. राष्ट्रीय रायफल्सच्या या तुकडीचे नेतृत्व कर्नल महाडिक यांच्याकडे होते. अतिरेक्यांचा पाठलाग करत लष्करी जवान व पोलिसांची तुकडी मंगळवारी सीमेलगतच्या हाजी नाका येथील दाट जंगलात शिरली तेव्हा अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात कर्नल महाडिक व काश्मीर पोलिसांच्या विशेष कृती दलातील मजलून अहमद यांच्यासह आणखी एक पोलीस शिपाई जखमी झाला. कर्नल महाडिक व इतर दोघा जखमींना हेलिकॉफ्टरने श्रीनगर येथे १५ कॉर्पस्च्या लष्करी कमांड इस्पितळात आणण्यात आले. परंतु डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त करूनही कर्नल महाडिक यांचे प्राण वाचू शकले नाहीत. (वृत्तसंस्था)
अतिरेक्यांची घुसखोरी वाढली
भारत व पाकिस्तान यांच्यातील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील बोलणी रद्द झाल्यापासून सीमेपलिकडून होणारी घुसखोरी व सीमेवरील गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. लष्कराच्या सूत्रांनुसार गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरमध्ये सीमापार घुसखोरीचे ७० प्रयत्न झाले होते व त्यातून ६५ दहशतवादी भारतात घुसले होते तर १३६ जणांना पुन्हा सीमेच्या पलिकडे पिटाळले गेले होते. त्याआधी वर्ष २०१३ मध्ये २८० अतिरेक्यांनी घुसखोरीचे ९१ प्रयत्न केले होते व त्यातून लष्कराच्या तिपेडी सुरक्षा व्यवस्थेला चकवा देऊन ९७ अतिरेकी भारतात घुसण्यात यशस्वी झाले होते.
सीमेवर पाकचा गोळीबार
जम्मू: पाकिस्तानी सैनिकांनी जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर सोमवारी रात्रभर गोळीबार करून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) प्रवक्त्याने सांगितले की, पाकी सैन्याने सांबा सेक्टरच्या सीमाभागात आंतरराष्ट्रीय सीमेवर तीन ते चार राऊंड गोळ्या डागल्या. त्यानंतर सीमेवर तैनात जवानांनी संशयास्पद हालचालींचा शोध घेण्याकरिता प्रकाश निर्माण करणारे गोळे फेकले. परंतु काहीही आढळले नाही. या गोळीबारात कोणतीही हानी झाली नसून जवान पाळत ठेवून आहेत.