संवादाच्या शक्यतांचा ‘सातारी शोध’ सातासमुद्रापार!
By Admin | Updated: April 21, 2015 01:00 IST2015-04-21T00:38:32+5:302015-04-21T01:00:55+5:30
यशस्वी कामगिरी : आंतरराष्ट्रीय महोत्सवात ‘अर्धविराम’ पहिल्या ३४ लघुपटांमध्ये दाखल

संवादाच्या शक्यतांचा ‘सातारी शोध’ सातासमुद्रापार!
सातारा : वर्षानुवर्षे वापरून भाषा गुळगुळीत आणि शब्द निरर्थक बनले आहेत का? भाषेतून संवाद साधण्याच्या शक्यता संपल्यात की काय? या प्रश्नांचे उत्तर शोधणाऱ्या सातारच्या कलावंतांचा ‘अर्धविराम’ हा लघुपट प्रतिष्ठेच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पहिल्या ३४ लघुपटांमध्ये दाखल झाला आहे.
आपण बोलतो म्हणजे काय करतो? आयत्या मिळालेल्या इंद्रियांप्रमाणेच भाषाही सहज उपलब्ध असल्याने उपचार म्हणून ती वापरू लागलो आहोत का? बोलण्याआधीचे समजून घेणे आपण बंद केले आहे का? हजारो वर्षे वापरून प्रत्येक शब्दाला असंख्य अर्थ आले आहेत, त्यामुळे माणसा-माणसातील पूल तुटू लागले आहेत का? या प्रश्नांनी भंडावलेला नायक भाषेतून संवादाच्या शक्यता शोधतो आहे. ‘तुम्ही मला बोलताना फक्त ऐकताय की बघताय,’ असा प्रश्न तो विचारतो आहे. त्याला ‘फक्त ऐकतोय,’ असे उत्तर मिळणे भीषण आहे, असे त्याला वाटते. भाषेतील रस, नवनिर्मितीची शक्यता संपलीय, संवाद साधणं बंद झालंय, असे त्याला वाटत राहते आणि तो भाषेचा राग करू लागतो. भाषेने केलेली ही कोंडी फोडण्याच्या प्रयत्नांचा हा सुमारे २५ मिनिटांचा प्रवास आहे. या प्रवासात त्याला कशा-कशाशी झटापट करावी लागते, हे या लघुपटात चित्रित केले आहे.
७२ देशांमधील उत्तमोत्तम लघुपटांशी स्पर्धा करून पहिल्या ३४ लघुपटांत स्थान मिळविणाऱ्या ‘अर्धविराम’ची कथा आणि संवाद हिमांशू स्मार्त यांनी लिहिली आहे. पटकथा, सृजन दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका अशी तिहेरी जबाबदारी किरण माने यांनी सांभाळली आहे. निर्मिती आणि दिग्दर्शन कोरेगावचे सुजित आणि सयाजी जाधव या पिता-पुत्रांनी केले आहे. छायाचित्रण कुमार डोंगरे, उमेश निगडे, तेजस दनाने, मंगेश यांचे असून, वीरेंद्र केंजळे यांनी पार्श्वसंगीत दिले आहे. दोन वर्षांपूर्वी साताऱ्यात लघुपटांचा महोत्सव झाला होता. त्या माध्यमातून आपल्याला अवगत असलेली चित्रभाषा दाखविण्याची संधी अनेकांना मिळाली होती. अनेक सातारकरांनी या महोत्सवात आपले लघुपट सादर केले होते. आंतरराष्ट्रीय महोत्सवातही यापूर्वी साताऱ्यातील अनेक दिग्दर्शक-कलावंतांचे लघुपट प्रदर्शित झाले आहेत. ‘अर्धविराम’ला मिळालेले यश सातारकरांच्या याच यशोमालिकेतील पुढील अध्याय आहे. (प्रतिनिधी)
मूकबधिरांचा सुरेख ‘संवाद’
विशेष म्हणजे, ‘अर्धविराम’ या लघुपटात सातारच्या मूकबधिर विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय अप्रतीम अभिनय केला आहे. यापैकी प्रथमेश शितोळे या मूकबधिर विद्यार्थ्याने लघुपटात विशेष उल्लेखनीय काम केले आहे.
साडेचारशे लघुपटांशी स्पर्धा
अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्वित्झर्लंड, इराक, स्पेन, स्वीडन, जपान, बेल्जियम अशा देशांमधील ४५० हून अधिक लघुपटांशी ‘अर्धविराम’ची स्पर्धा झाली. परीक्षक म्हणून हॉलिवूडचे आॅस्करविजेते निर्माते, दिग्दर्शक, कॅमेरामन मार्क वॅशेट, लेखक इम्तियाज हुसैन आणि अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी काम पाहत आहेत.