झेडपीतील सत्यनारायण पूजा वादात
By Admin | Updated: August 20, 2015 21:39 IST2015-08-20T21:39:54+5:302015-08-20T21:39:54+5:30
दाभोलकर स्मृतिदिनी रंगला सोहळा : राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षता मूल्याचे अवमूल्यन--जिल्हा परिषदेतून

झेडपीतील सत्यनारायण पूजा वादात
सागर गुजर- सातारा शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांना पुढे नेत असताना प्राण अर्पण करणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदान दिवसाचे औचित्य साधून सातारा शहरात धर्मनिरपेक्ष तरुणाई रस्त्यावर उतरली होती. शहरातून निषेधाच्या घोषणा दिल्या गेल्या; पण दुर्दैवाने त्यांच्याच स्मृतिदिनी जिल्हा परिषदेच्या इमारतीत सत्यनारायणाची पूजा घालून समतेचे मूल्य पायदळी तुडविले गेले. येथील जिल्हा परिषदेच्या इमारतीत गुरुवारी (दि. २० आॅगस्ट) श्रावण मासानिमित्त सत्यनारायण पूजा घालण्यात आली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, उपाध्यक्ष रवी साळुंखे यांच्या उपस्थितीत हा सोहळा गुरुवारी दिवसभर सुरू राहिला. अनेकांनी गोड शिरा अन् दुधावर ताव मारला. त्याचे झाले असे, सातारा जिल्हा परिषद कर्मचारी आर्थिक सहाय्य संस्थेचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले आहे. यानिमित्त व श्रावण मासाचे औचित्य साधून गुरुवारी या संस्थेत सत्यनारायण पूजा घालण्यात आली. वास्तविक ही संस्था जिल्हा परिषदेच्या मालकीच्या इमारतीत सुरू आहे. शासकीय कार्यालयांमध्ये कुठल्याही भारतीय राज्यघटनेतील आदर्श मूल्यानुसार कोणत्याही एका धर्माचे महत्त्व वाढावे, या हेतूने शासकीय कार्यालयांमध्ये कार्यक्रम घेता येत नाही. किंबहुना त्यांच्यात एकी नांदावी, या हेतूने राजकीय पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वागणे अपेक्षित असते; पण या धर्मनिरपेक्षतेचा सिध्दांतच जिल्हा परिषदेत पायदळी तुडविण्यात आला.
या पूजेला सभापती अमित कदम, मानसिंगराव माळवे, मोरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. बी. पाटील, संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजू कदम, महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, शशिकांत कांबळे, उद्धव राऊत, ईलाही मुलाणी, मनोरंजना सरगर यांनीही हजेरी लावली.
शासकीय पातळ्यांवर सत्यनारायणविरोधी चळवळ जोम धरू लागली असताना पुरोगामी विचारांच्या साताऱ्यातच या चळवळीला खो बसला आहे.
दरम्यान, याबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांचे मत जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
जिल्हाधिकारी मागविणार अहवाल
साताऱ्यात यापूर्वीही जिल्हा परिषदेमध्ये सत्यनारायण पूजा घालण्याचा प्रकार घडला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी चौकशी समिती नेमली होती. जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमून या सत्यनारायण पूजेची चौकशी करून अहवाल देण्याची लेखी नोटीस बजावली होती. दरम्यान, याच कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयातील सत्यनारायणाची तयारी रद्द करण्यात आली होती. या पूर्वीच्या घटनेला यानिमित्ताने उजाळा मिळाला असून, गुरुवारच्या प्रकाराबाबतही जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी अहवाल मागविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
सत्यनारायण पूजा भारतीय राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्षता हे मूल्य आहे. शासकीय कार्यालय, दालनात पूजा अर्चा करण्यात येत नाही. धर्मनिरपेक्ष हाच कारभार असला पाहिजे. शासकीय परिपत्रकानुसार देव-देवतांची छायाचित्रे शासकीय कार्यालयांत लावता येत नाहीत. या परिपत्रकानुसार २४ ते २५ महापुरुषांसह राष्ट्रपतींचे छायाचित्र कार्यालयांमध्ये लावण्यात यावे, असे म्हटले आहे.
- अरुण जावळे,
वैचारिक चळवळीतील कार्यकर्ते
भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष आहे, शासकीय कार्यालयांमध्ये कुठल्याही एका धर्माचे गोडवे गाणारे सोहळे आयोजित करता येत नाहीत. जिल्हा परिषदेत असे झाले असल्यास त्यांच्याकडून चौकशी अहवाल मागवून घेतो.
- अश्विन मुदगल,
जिल्हाधिकारी