वनविभागाकडून भक्तांची सत्त्वपरीक्षा!
By Admin | Updated: December 30, 2014 23:24 IST2014-12-30T21:53:20+5:302014-12-30T23:24:49+5:30
घाटरस्ता धोकादायक : भरघोस मतांचा आशीर्वाद देणारी घुमाईदेवी दुर्लक्षित

वनविभागाकडून भक्तांची सत्त्वपरीक्षा!
पिंपोडे बुद्रुक : श्री घुमाईदेवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या कामात वनविभाग आडकाठी आणत आहे. घाट रस्त्याला संरक्षक कठडे नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली असून या रस्त्याचे डांबरीकरण करून संरक्षक कठडे बांधावेत, अशी भाविकांची मागणी आहे. हे देवस्थान जागृत असल्याने निवडणुका आल्यावर सर्वच उमेदवार व राजकरणी विजयाचे साकडे घालण्यासाठी देवीच्या दर्शनाला जातात. मात्र, अनेकांना या रस्त्याच्या दुरवस्थेचा विसर पडला असल्याचे दिसून येत आहे.
कोरेगाव तालुक्यातील प्रमुख व जागृत देवस्थान म्हणून श्री घुमाईदेवीची ओळख आहे. दरीतील देवीच्या भव्य व आकर्षक मंदिराला चहूबाजूंनी डोंगरानी वेढलेले आहे. याठिकाणी दर मंगळवार आणि शुक्रवारी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. तसेच प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेला देवदर्शनासाठी गर्दी होते. पिंपोड्यापासून हे देवस्थान चार किलोमिटरवर आहे. त्यामुळे बहुतांश भाविक दुचाकी, चारचाकी वाहनातुन दर्शनासाठी जातात. गावापासून भावेनगरपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट झाल्याने पूर्ण रस्ता उखडला आहे. त्यामुळे खड्यात रस्ता ्रकी रस्त्यात खड्डे हेच कळत नाही. भावेनगर गावापासून ते देवीच्या स्वागत कमानीपर्यंत सुमारे अर्धा किलोमीटरच्या रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. मात्र तेथून पुढे एक मिलोमिटरचा कच्चा घाटरस्ता आहे. या रस्त्यावर सर्वत्र अस्ताव्यस्त खडी पसरली आहे. तीव्र उतार व वेडीवाकडी वळणे यामुहे हा रस्ता धोकादायक बनला आहे. त्यातच रस्त्याच्या दुतर्फा संरक्षक कठडे नसल्याने वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. देवदर्शन निर्धोक होण्याकरिता या रस्त्याचे त्वरीत डांबरीकरण करून घाटात संरक्षक कठडे बांधावेत अशी भक्तांची मागणी आहे. (वार्ताहर)
पिंपोडे बुद्रुक गावापासून देवीच्या मंदिरापर्यंत रस्ता अत्यंत खराब झाला आहे. घाट रस्ता डांबरीकरण करुन घाटात संरक्षक कठडे बांधणे गरजेचे आहे. घाटातून भाविकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो.
- संतोष सूळ
सरपंच, भावेनगर
केवळ दिवसाच घेता येते दर्शन
घुमाईदेविची यात्रा कोजागिरी पोर्णिमेस भरते. यात्रेसाठी भाविक राज्यभरातून मोठ्या प्रमाणात येतात. मात्र घाट रस्ता धोकादायक असल्यामुळे व मंदिर खोल दरीत असल्यामुळे डोंगर माथ्यावर वाहनतळ उभारून तेथून खाली दरीत पायी चालत जावे लागते. याठिकाणी वीजेची सोय नसल्यामुळे संध्याकाळी दर्शनासाठी जाण्यासाठी अडचणीचे होते. त्यामुळे भाविकांना देवीचे दर्शन दिवसा घेवून लगेचच परतीचा प्रवास करावा लागतो. मात्र या समस्येकडे लक्ष यायला कोणालाही वेळ नसल्याचे दिसून येते.