आंतरराष्ट्रीय मोटोक्रॉस स्पर्धेत साताऱ्याची तनिका शानभाग
By Admin | Updated: March 15, 2017 22:48 IST2017-03-15T22:48:38+5:302017-03-15T22:48:38+5:30
मलेशियात फडकवणार झेंडा : ज्युनिअर गटातील भारतीय पहिल्या मुलीचा मान

आंतरराष्ट्रीय मोटोक्रॉस स्पर्धेत साताऱ्याची तनिका शानभाग
सातारा : मलेशियात २३ ते २५ मार्च दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मोटोक्रॉस स्पर्धेसाठी साताऱ्याच्या तनिका शानभाग हिची निवड झाली आहे. ज्युनिअर गटातून निवड झालेली तनिका ही देशातील पहिली महिला खेळाडू ठरली आहे. स्पर्धेत जगभरातून चाळीसहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत.
तनिकाने गेल्या वर्षी झालेल्या देशांतर्गत विविध चार स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी बजावली होती. यामध्ये दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रथमच सहभाग घेऊन तिने तिसरा क्रमांक मिळवला. याशिवाय जयपूर, पुणे व बेंगलोर येथे तिने स्पर्धेतून चुणूक दाखविल्यामुळे तिची मलेशियातील या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. प्रोफेशनल मोटोक्रॉस, मोटार सायकल चालवत सध्या ती दररोज तासभराहून अधिक काळ शास्त्रीय पद्धतीने सराव करत आहे. (प्रतिनिधी)
तिसरी पिढी
वडील संकेत शानभाग व आजोबा रमेश शानभाग यांनी यापूर्वी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोटोक्रॉस स्पर्धा व गो कार्टिंग स्पर्धांमधून यश मिळविले होते. हेच बाळकडू तनिकाला मिळाले असून, ती शानभाग परिवारातील तिसरी पिढी म्हणून चमकत आहे.
सहा लाखांची गाडी अन् पाच एकरांचा ट्रॅक
मलेशियातील स्पर्धेसाठी सुमारे ६ लाख रुपयांची मोटारसायकल ती वापरणार आहे. यासाठी घराजवळील परिसरात तनिकासाठी पाच एकर परिसरात ट्रॅक बनवण्यात आला आहे. या ट्रॅकवर तासभर सराव, दररोज बास्केटबॉल सराव व १० ते १५ किलोमीटर सायकलिंग करत तनिका परिश्रम घेत आहे.