शनिवारचा दिवस चक्क दप्तराविना!

By Admin | Updated: June 22, 2016 00:09 IST2016-06-21T22:03:12+5:302016-06-22T00:09:54+5:30

प्रयोग चाकोरीबाहेरचा : अहिरे शाळेत एक दिवस अवांतर वाचनासाठी

Saturday day without a dapatara! | शनिवारचा दिवस चक्क दप्तराविना!

शनिवारचा दिवस चक्क दप्तराविना!

दशरथ ननावरे -- खंडाळा  -शिक्षण क्षेत्रातही खासगी शाळांचे प्रस्थ वाढत असताना जिल्हा परिषदेच्या खंडाळा तालुक्यातील अहिरे प्राथमिक शाळेने गुणवत्तेसह विविध उपक्रम राबवून वेगळा ठसा उमठविला आहे. बालवयात वाचनाची गोडी लागावी यासाठी दर शनिवारी ‘दप्तराविना शाळा’ हा उपक्रम राबविला जातो. सकाळच्या वातावरणात मनोरंजक, साहसी गोष्टींबरोबरच सामान्य ज्ञानावर आधारित पुस्तकांमध्ये मुलं रममान झालेली पाहायला मिळतात.अहिरे प्राथमिक शाळेने ज्ञानरचना वादाचा पुरस्कार करून आनंददायी शिक्षणाने सुसंस्कारीत मुले घडविणाऱ्या या जगावेगळ्या शाळेत शैक्षणिक आणि बालसंस्कारावरील चित्रपट दाखवून उज्ज्वल भविष्याचा पाया रचला जात आहे. नियोजित पाठ्यक्रमातील अभ्यासाव्यतिरिक्त ई लर्निंगचा प्रभावी वापर केल्याने विद्यार्थ्यांच्या बौद्धीकतेत सुधारणा झाली. तर ज्ञानरचना वाद अध्यापन पद्धतीने मुले आता स्वत: शिकू लागली आहेत.
कॉन्व्हेंटच्या शाळेसारखे विद्यार्थ्यांचे गणवेश, शिस्तबद्ध प्रशासन, शाळेच्या परिसरात फुललेली बाग म्हणजे वेगळे वैशिट्य ठरले आहे. खेळाचे आधुनिक मैदान आणि मनोरंजक खेळणीने विद्यार्थ्यांचा सुटीचा वेळही आनंदमय जातो. लोकसहभाग आणि पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने शाळेने प्रगतिपथावर वाटचाल केली आहे.
बोलके व्हरांडे, प्रत्येक वर्गातील रंगरंगोटी, शैक्षणिक साहित्यांची भरभराट, फरशीवरही अध्यापन-अध्ययन पेटिंग, परिपाठातून मूल्यसंस्कार असे एक ना अनेक गोष्टींनी शाळा परिपूर्ण बनलेली आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांचा ओढा या शाळेकडे वाढला आहे.


उपक्रमांची चाळीशी
एक हजार झाडांची बाग, परसबागेत औषधी वनस्पती, सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा, प्रत्येक वर्गात सॉफ्टवेअरसह संगणक उपलब्ध, आदर्श परिपाठ व गीतमंच, उत्कृष्ट नृत्य मार्गदर्शन, ज्ञानकुंभ, कलादालन, राजकुमार-राजकुमारी निवड, प्रत्येक वर्गात साऊंड सिस्टीम, सेमी इंग्लिश अध्यापन, सणाला संस्कृतीदर्शन, परिसर भेट, स्पर्धा परीक्षा यासारखे तब्बल चाळीस उपक्रम राबविले जातात.
बागकामातून श्रमसंस्कार
शालेय बागेत आठवड्यातून किमान एक तास झाडांची निगा व इतर कामे करून विद्यार्थ्यांना झाडांविषयी ज्ञान दिले जाते. तसेच त्यांच्यावर श्रमदानाचे संस्कारही केले जातात.


शाळा परिसर सुशोभीत करण्याबरोबरच विद्यार्थ्यांची सर्वांगीण गुणवत्ता वाढविण्यावर आमचा भर आहे. खासगी शाळांपेक्षा कितीतरी पटीने अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन पालकांचा विश्वास संपादन केला आहे. यामध्ये शिक्षकांचा वाटा मोठा आहे. विविध उपक्रमांमुळे शाळा जिल्हा पातळीवर झळकली आहे. ‘आयएसओ’ मानांकन मिळविण्याचे ग्रामस्थांचे स्वप्न आहे.
- प्रशांत गंधाले,
मुख्याध्यापक

Web Title: Saturday day without a dapatara!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.