शततारांच्या झंकाराने सातारकरांना बांधले !
By Admin | Updated: January 23, 2015 00:39 IST2015-01-22T23:56:50+5:302015-01-23T00:39:35+5:30
अविस्मरणीय मैफल : पंडित शिवकुमार शर्मा यांच्या संतूरमधून बरसल्या स्वरधारा

शततारांच्या झंकाराने सातारकरांना बांधले !
सातारा : पहाडी संगीताची आठवण करून देणाऱ्या संतूरच्या शततारा आणि त्यातून पंडित शिवकुमार शर्मा यांनी नादब्रह्माला घातलेली साद. सोबतीला पंडित योगेश सम्सी यांच्या तबल्याची जादू... सातारकर रसिकांना आणखी काय हवे होते? दोन तासांहून अधिक काळ श्रोते डोलत राहिले आणि संतूरमधून स्वरांचे पाणलोट वाहत राहिले.
सातारच्या ‘पंचम’ ग्रुपने पुण्याच्या व्हायोलिन अॅकॅडमीच्या सहकार्याने ही मैफल सातारच्या शाहू कलामंदिरात आयोजित केली होती. सुमारे तीस वर्षांनंतर साताऱ्यात आलेल्या पं. शिवकुमार शर्मा यांनी वयाच्या ७८ व्या वर्षीही संगीताची तीच मोहिनी सातारकर रसिकांवर घातली. ‘यमन’ रागातील आलापांनी पंडितजींनी मैफलीस प्रारंभ केला. स्वरांची आस, बारकावे दाखविण्याचे कसब हेच पंडितजींचे श्रेष्ठत्व असल्याचा पुन:प्रत्यय रसिकांना आला. संथ आलापीने सुरुवात करून रागविस्ताराची पायाभरणी त्यांनी केली. जोड वाजविताना लयीचे विविध प्रकार सादर केले. द्रुत लयीत झपताल आणि त्रितालातील रचना त्यांनी सादर केल्या. तबलावादक पं. सम्सी आणि पंडितजींची जुगलबंदी अद्वितीय होती. उत्तरार्धात खेमटा तालातील मिश्र धुन सादर करून पंडितजींनी प्रेक्षागृहाला डोलायला लावले. या धुनमधील वैविध्य, गतिमानता आणि आकृतिबंध खिळवून ठेवणारे होते. (प्रतिनिधी)२२२