शाहूनगरचे मूलभूत प्रश्न मार्गी लावल्याचे समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:35 IST2021-05-22T04:35:45+5:302021-05-22T04:35:45+5:30
सातारा : शाहूनगरसह त्रिशंकू भागाचा नुकताच सातारा शहराच्या हद्दवाढीत समावेश झाला आहे. येथील पाणी व्यवस्था, वीज तसेच नाले स्वच्छतेची ...

शाहूनगरचे मूलभूत प्रश्न मार्गी लावल्याचे समाधान
सातारा : शाहूनगरसह त्रिशंकू भागाचा नुकताच सातारा शहराच्या हद्दवाढीत समावेश झाला आहे. येथील पाणी व्यवस्था, वीज तसेच नाले स्वच्छतेची कामे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी प्राधान्याने मार्गी लावण्याचे काम हाती घेतले आहे. त्यांच्या माध्यमातून इतर प्रश्नही तातडीने मार्गी लागतील, असे मत उद्योजक सागर भोसले यांनी व्यक्त केले.
शाहूनगर तसेच चार भिंती परिसराची तातडीने स्वच्छता केल्याबद्दल उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांचा शाहूनगर येथील नागरिकांनी सत्कार केला. याप्रसंगी ते बोलत होते. सागर भोसले पुढे म्हणाले, शाहूनगर व त्रिशंकू भागाचा हद्दवाढीत समावेश झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. येथील अनेक मूलभूत प्रश्न आता हळूहळू मार्गी लागतील व नागरिकांना पालिकेकडून सर्व सोयी-सुविधा उपलब्ध होतील.
शाहूनगर भागात डोंगरावरून येणाऱ्या पाण्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी जात होते. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या चरींमध्ये दगड, माती, कचरा असल्यामुळे चरी मुजल्या होत्या. याची माहिती उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांना दिल्यानंतर त्यांनी तातडीने स्वत: उपस्थित राहून, एक जेसीबी व सहा कर्मचाऱ्यांच्या मदतीने शाहूनगर व चारभिंती येथील चरी मोकळ्या करण्याबरोबरच या परिसराची स्वच्छतादेखील केली. येथील मूलभूत प्रश्न तातडीने मार्गी लावल्याने नागरिकांमधूनही समाधान व्यक्त करण्यात आले.
फोटो : २१ मनोज शेंडे
उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांचा उद्योजक सागर भोसले व शाहूनगर येथील नागरिकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.