सातारकरांनो दारे, खिडक्या नीट बंद करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:23 IST2021-09-02T05:23:17+5:302021-09-02T05:23:17+5:30
सातारा : ‘सकाळी व रात्री आपल्या घराची दारे, खिडक्या नीट लावा. घराचा परिसर स्वच्छ ठेवा. अन्यथा तो कधीही तुम्हाला ...

सातारकरांनो दारे, खिडक्या नीट बंद करा!
सातारा : ‘सकाळी व रात्री आपल्या घराची दारे, खिडक्या नीट लावा. घराचा परिसर स्वच्छ ठेवा. अन्यथा तो कधीही तुम्हाला ‘दंश’ मारू शकतो. असं सांगण्याची वेळ आता सातारकरांवर आली आहे. कारण दंश करणारा दुसरा-तिसरा कोणी नसून चक्क डेंग्यूचा डास आहे. हिवताप विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार पाच दिवसात शहरातील तब्बल १८४ घरांत डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या असून, २८ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे.
जिल्ह्यासह सातारा शहरात गेल्या काही दिवसांपासून साथरोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. बहुतांश नागरिकांमध्ये डेंग्यूची लक्षणे आढळून आल्याने सातारा पालिका व हिवताप विभागाने डेंग्यू प्रतिबंधासाठी ठोस पावले उचलली आहेत. शहरात सर्व्हेचे काम सुरू करण्यात आले असून, यासाठी आशा सेविकांच्या १३ पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. ज्या भागात डेंग्यू संशयित रुग्ण आढळून येत आहेत, त्या भागातील घरांना तातडीने भेटी देऊन नागरिकांच्या आरोग्याच्या नोंदी घेतल्या जात आहे. तसेच डास अळ्यांचा शोध घेऊन त्या नष्टही केल्या जात आहेत.
पाच दिवसांत पथकाकडून शहरातील एक हजार ३५८ घरांना भेटी देण्यात आल्या. यापैकी तब्बल १८४ घरांत डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. तसेच हिवताप विभागाच्या सर्व्हेनुसार २८ जण डेंग्यूबाधित आढळून आले असले तरी खासगी रुग्णालयात उपचार घेणा-या बाधितांची संख्या अधिक आहे. डेंग्यूच्या डासांची पैदास ओलसर जागेत होते. हा डास दिवसभरात सुमारे नऊ जणांना चावा घेतो. वारंवार आवाहन व प्रबोधन करूनही नागरिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत आहे. परिणामी शहरात डेंग्यूचे रुग्ण सातत्याने आढळून येत आहेत. नागरिकांनी ही बाब गांभिर्याने घेणे गरजेचे आहे.
(चौकट)
...पण डेंग्यू नको
कोरोना झाल्यानंतर रुग्ण योग्य औषधोपचारानंतर काही दिवसांतच बरा होतो. मात्र, डेंग्यू झालेल्या रुग्णाला अधूनमधून येणारा ताप, पेशींची कमतरता, सांधेदुुखी, तीव्र वेदना अन् अशक्तपणामुळे असह्य वेदना सहन कराव्या लागतात. त्यामुळे ‘एकवेळ कोरोना परवडला पण डेंग्यू नको’ अशी प्रतिक्रिया एका डेंग्यूबाधित व्यक्तीने ‘लोकमत’शी बोलताना दिली.
(कोट)
पाच दिवसांचा लेखाजोखा
१३५८ घरांना भेटी
७६१७ नागरिकांच्या नोंदी
२४२७ पिंप तपासले
१८४ घरातील पिंपात डेंग्यू अळ्या आढळल्या
६२ पिंपात जंतूनाशक टाकले
१२१ पिंप रिकामे केले