दिल्लीच्या कलामंचावर ‘आम्ही सातारकर’!

By Admin | Updated: November 11, 2015 23:47 IST2015-11-11T21:18:43+5:302015-11-11T23:47:17+5:30

राष्ट्रीय कला महोत्सव : पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या स्पर्धेसाठी सातारा संघाची निवड

'Satarkar' on the Kalamanchi of Delhi! | दिल्लीच्या कलामंचावर ‘आम्ही सातारकर’!

दिल्लीच्या कलामंचावर ‘आम्ही सातारकर’!

सातारा : आधी तालुकास्तरावर, मग जिल्हास्तरावर आणि पुन्हा विभागीय स्तरावरील कला महोत्सवात आपल्या कलेची छाप उमटवणाऱ्या सातारा जिल्हा संघाची निवड राष्ट्रीय कला महोत्सवासाठी झाली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कला महोत्सव होणार असून राजधानी दिल्लीच्या राष्ट्रीय मंचावर सातारच्या विद्यार्थ्यांचे लोकनाट्य सादर होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीपासून शालेय विद्यार्थ्यांसाठी कला महोत्सवाचे सुरू केला आहे. यंदा झालेल्या तालुकास्तर, जिल्हास्तर व सातारा येथे झालेल्या विभागीय या तिन्ही पातळीवर सातारा संघाने यशाचा झेंडा रोवला असून आता दिल्ली काबीज करण्यासाठी कसून सराव सुरू केला आहे.
सातारा संघात जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे न्यू इंग्लिश स्कूलच्या पाच विद्यार्थ्यांना या संघात स्थान मिळाले आहे. रूषिका कदम, ऋत्विक नावडकर, आसावरी साबळे, तनया फडतरे आणि प्रणव भिलारे यांचा या संघात समावेश आहे. ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या संकल्पनेवर आधारित या लोकनाट्याचे लेखन आणि दिग्दर्शन याच शाळेचे शिक्षक जगदीश पवार यांनी केले असून कला शिक्षक सचिन राजोपाध्याय यांची त्यांना साथ मिळत आहे. दृश्यकला आणि लोकनृत्यासाठी घनशाम नवले, सचिन माळी, सीमा जोशी, रुपाली हराळे यांचे मार्गदर्शन लाभले.
खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या राष्ट्रीय कला महोत्सवासाठी देशातील प्रत्येक राज्याचे संघ सहभागी होणार आहेत. त्यामुळे जय्यत तयारी करूनच स्पर्धेत उतरावे लागणार असून सातारा संघाने सराव सुरू केला आहे. (प्रतिनिधी)

पाच लाखांचे पारितोषिक
राष्ट्रीय कला महोत्सवात पहिल्या क्रमांकासाठी पाच लाखांचे बक्षीस असून ते जिल्हा शिक्षण विभागाला मिळणार आहे. शिवाय यशस्वी संघांना दि. १२ डिसेंबर रोजी पुन्हा सर्व खासदारांसमोर आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे कसून सराव करून या स्पर्धेत दिल्ली काबीज करणारच, असा विश्वास विद्यार्थी आणि शिक्षकांनी व्यक्त केला. या स्पर्धेत बाजी मारली तर दिल्लीच्या कलामंचावर सातारचे नाव कायमचे कोरले जाणार आहे.

पंतप्रधानांनी सुरू केलेल्या कला महोत्सवात ‘आम्ही सातारकर’ टीमने तिन्ही पातळीवर आपल्या कलेची छाप उमटविली आहे. तमाशाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचे काम यातून केले आहे. यामध्ये गण, गवळण, लावणी, बतावणी, वग आणि भैरवी आहे. आता दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत आमचा संघ कला सादर करणार आहे. तत्पूर्वी दि. २० नोव्हेंबरपर्यंत त्यांना आम्ही सादर करणाऱ्या लोकनाट्य तमाशाचा प्रोजेक्ट पाठवायचा आहे. त्यासाठी तमाशा फडांना भेटून माहिती घेतली जात आहे. काही दिवसांत सरावही सुरू करणार आहे.
- जगदीश पवार, शिक्षक

सातारा जिल्ह्याला वैभवशाली ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अनेक शूरवीर सातारच्या मातीत जन्माला आले. सेवानिवृत्तांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्याचे नाव आता कलेच्या प्रांतातही अव्वल असल्याचे राजधानी दिल्लीत सातारचा संघ दाखवून देईल, असा विश्वास वाटतो.
-एच. ए. फकीर,
मुख्याध्यापिका, न्यू इंग्लिश स्कूल, सातारा

Web Title: 'Satarkar' on the Kalamanchi of Delhi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.