मराठी रंगभूमीवर ‘सातारी धाडस’!
By Admin | Updated: December 17, 2015 23:02 IST2015-12-17T22:42:08+5:302015-12-17T23:02:26+5:30
रविवारी शुभारंभाचा प्रयोग : ‘परफेक्ट मिसमॅच’साठी अपघातानं भेटत गेले ‘परफेक्ट मॅच’

मराठी रंगभूमीवर ‘सातारी धाडस’!
सातारा : व्यावसायिक रंगभूमीवर नाटक करताना अनेक कल्पनांना मुरड घालावी लागते म्हणून स्वत:च निर्माता होण्याचा धाडसी निर्णय घेणाऱ्या सातारच्या कलावंताला मुंबईत एकापाठोपाठ एक ‘पॅशनेट’ रंगकर्मी मिळत गेले.
सर्वांनी मिळून ‘परफेक्ट मिसमॅच’ या आगळ्या नाटकाची मोट बांधली आणि ही मंडळी शुभारंभाचा प्रयोग सातारच्या शाहू कला मंदिरात येत्या रविवारी (दि. २०) सादर करीत आहेत.
सातारचा रंगकर्मी किरण माने मुंबईत अनेक वर्षे काम करतो आहे. मूळचा समांतर रंगभूमीवरचा हा कलावंत असल्यामुळं व्यावसायिक तडजोडी करताना छातीवर धोंडा ठेवावा लागतो, असा त्याचा अनुभव. त्यामुळं स्वत:च निर्माता व्हायचं, असा धाडसी निर्णय त्यानं घेतला; पण ‘परफेक्ट मिसमॅच’ या नाटकाच्या प्रवासात त्याला ‘सहनिर्माता’च व्हावं लागलं. कारण निर्मात्यापासून सहकलावंतांपर्यंत सर्वजण नाटकाच्या वेगळेपणामुळं एकमेकांशी आपोआप बांधले गेले.
नाटकाचं लेखन कोल्हापूरच्या हिमांशू स्मार्तचं. वाचन झालं आणि किरण मुंबईत कलावंत, तंत्रज्ञ, सहनिर्मात्यांचा शोध घेऊ लागला. कुणाला ‘नामवाला’ कलावंत हवा, तर कुणाला नाटकात मोठे बदल हवेत. ही कोंडीही साताऱ्यातच फुटणार होती.
दिग्दर्शक मंगेश कदम आणि अभिनेत्री लीना भागवत साताऱ्यात एका प्रयोगासाठी आले असताना किरणने ‘परफेक्ट मिसमॅच’च्या वाचनाचा घाट घातला. आपण थकलो असल्याने वाचनात फार लक्ष लागणार नाही, असं सांगणाऱ्या लीना भागवत यांचा थकवा नाटकाचा विषय पाहून पळून गेला आणि केवळ वाहवा न करता ‘आपण सर्वांनी मिळून असे विषय रंगभूमीवर आणले पाहिजेत,’ अशी प्रतिक्रिया देऊन त्यांनीही कंबर कसली.
प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष यांनीही ‘असा रोल मराठी नाटकात आजवर लिहिलाच गेला नाही,’ अशी प्रतिक्रिया नोंदवून नाटकात काम करण्याची तयारी केली.
मंगेश कदम यांनी हे नाटक दिग्दर्शित केलंय. नंदू कदम यांनी निर्मितीची जबाबदारी उचलली. प्रदीप मुळ्ये यांनी नेपथ्याचं अवघड आव्हान पेललं आणि तालमी सुरू झाल्या. निर्मितीची प्रक्रियाही इतर व्यावसायिक नाटकांसारखी
ठाशीव नव्हती, असं या चमूतले
सर्वच कलावंत, तंत्रज्ञ सांगतात. (प्रतिनिधी)
दोघे सातारकर, म्हणून...
अभिनेत्री अमृता सुभाष याही सातारकरच. रहिमतपूर त्यांचं आजोळ, तर साताऱ्यात बालपण व्यतीत झालेलं. त्यामुळं पहिला प्रयोग साताऱ्यात करण्याची कल्पना पुढे आली आणि सर्वांनी उचलून धरली. ही ‘परफेक्ट मॅच’ व्यक्तींची टीम रविवारी पहिला प्रयोग शाहू कला मंदिरात करून एका अर्थानं शिवधनुष्यच पेलू पाहत आहे.