साताऱ्याचा पारा पुन्हा खालावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:29 IST2021-06-04T04:29:08+5:302021-06-04T04:29:08+5:30
पुन्हा खालावला सातारा : जिल्ह्यातील किमान आणि कमाल तापमान गेल्या काही दिवसांपासून खालावू लागले आहे. सध्या साताऱ्याचे कमाल ...

साताऱ्याचा पारा पुन्हा खालावला
पुन्हा खालावला
सातारा : जिल्ह्यातील किमान आणि कमाल तापमान गेल्या काही दिवसांपासून खालावू लागले आहे. सध्या साताऱ्याचे कमाल तापमान ३३, तर किमान तापमान २१ अंशांपर्यंत पोहोचले आहे. गुरुवारी दिवसभर आभाळ काळ्याकुट्ट ढगांनी व्यापून गेले होते. दुपारच्या सुमारास काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. वातावरणात झालेल्या बदलामुळे सायंकाळनंतर थंडीची तीव्रता देखील वाढत आहे.
सदर बझार येथे
सांडपाणी रस्त्यावर
सातारा : पालिकेकडून वारंवार स्वच्छता करूनही सदर बझार येथील गटारे व नाले कचऱ्याने तुडुंब भरत आहेत. गटारातील सांडपाणी मुख्य रस्त्यावर वाहत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरत असून, याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी आरोग्य विभागाने ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लावावी, अशी मागणी होत आहे.
सातारा शहरात
पाण्याचा अपव्यय
सातारा : कास व शहापूर पाणी योजनेच्या जलवाहिनीला सातत्याने गळती लागत आहे. त्यामुळे अनेक भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. असते असताना शहरातील बहुतांश नागरिक पाण्याचा वारेमाप उपयोग करत आहेत. अंगणात पाणी शिंपडण्यापासून ते गाड्या धुण्यापर्यंत पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी केली जात आहे. अशा नागरिकांवर पालिकेने कारवाई करणे गरजेचे आहे.
दुभाजकांमधील
फुलझाडांना उभारी
सातारा: शहरातील रस्त्यांलगत पालिकेच्या वतीने विविध प्रकारची फुलझाडे लावण्यात आली आहेत. उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने याची झळ वृक्षांनाही बसू लागली होती. मात्र, काही काही दिवसांपूर्वी झालेल्या माॅन्सूनपूर्व पावसामुळे कोमेजून चाललेल्या या फुलझाडांना उभारी मिळाली आहे. पाण्याअभावी ही फुलझाडे वाळून चालली होती.
नागरिकांकडून
नियमांचे उल्लंघन
सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असताना नागरिकांना याचे काही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. नागरिकांकडून वारंवार सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केले जात आहे. तसेच मास्कचा वापरही केला जात नाही. संचारबंदीचे निर्बंध शिथिल झाले नसताना अनेक नागरिक बाजारपेठेत फेरफटका मारत असून, कोरोना संक्रमणाचा धोका वाढू लागला आहे.