सातारचा कंदी पेढा आता येणार यंत्रातून!
By Admin | Updated: September 13, 2014 00:04 IST2014-09-13T00:03:39+5:302014-09-13T00:04:24+5:30
पेढे बनविणारी मशीन दाखल : दहा किलोचे काम अवघ्या दहा मिनिटांत

सातारचा कंदी पेढा आता येणार यंत्रातून!
जगदीश कोष्टी / सातारा
विशिष्ट चवीमुळे सातारचे कंदी पेढे सातासमुद्रापार गेले आहेत. आपल्याकडे कोणताही पाहुणा आल्यास त्याच्या स्वागताला किंवा कोणाकडे जाताना हमखास कंदीपेढे दिले जातात. याच सातारच्या कंदी पेढ्यांना यांत्रिक स्पर्श झाला आहे. मशीनमुळे एकाच आकारातील पेढे कमी वेळेत बनविणे सोपे जाणार आहे.
खव्याप्रमाणे जास्त पण साखर कमी, त्यात वेलचीचे चांगले प्रमाण यामुळे असंख्य खवय्यांच्या जिभेवर अनेक दशकांपासून अधिराज्य गाजवणारा कंदी पेढा केवळ सातारची ओळख राहिलेला नाही. याला विविध प्रांतांतून मागणी मोठी असते. हे पेढे मजुरांकडून केले जात होते. त्यामुळे जंतूसंसर्ग होण्याचा धोका असतो. तो टाळण्यासाठी आजवर सर्वच स्तरातून प्रयत्न केले जात होते.
सातारा येथील एसटी उपहारगृहात कमी वेळेत व कमी कष्टात पेढे तयार करता यावेत, यासाठी पुण्याहून मशीन आणली आहे. यामध्ये पेढे बनविण्यासाठी लागणारे मिश्रण तयार करून मशीनमध्ये टाकले असता हव्या त्या आकारातील पेढे बनविता येतात. दहा किलोचे पेढे बनविण्यास मजुरांना साधारणत: एक तास लागतो. मात्र, हेच काम मशीनमुळे अवघ्या दहा मिनिटांत होणार आहे. मशीन हाताळण्यासाठी एक माणूसही पुरेसा आहे. या मशीनच्या साह्याने गुलाबजामही कमी वेळेत बनविता येणार आहे.