सातारकर अनुभवणार ‘आग्य्राहून सुटकेचा थरार’

By Admin | Updated: May 30, 2014 00:52 IST2014-05-30T00:51:44+5:302014-05-30T00:52:04+5:30

सचित्र माहिती : दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांचे सादरीकरण मंगळवारी शाहू कला मंदिरात

Satarakar will experience 'Thakur of freedom from fire' | सातारकर अनुभवणार ‘आग्य्राहून सुटकेचा थरार’

सातारकर अनुभवणार ‘आग्य्राहून सुटकेचा थरार’

सातारा : आग्य्राहून सुटका ही शिवाजी महाराजांच्या जीवनातील अद््भुत घटना मानली जाते. ही सुटका नेमकी कशी झाली, शिवरायांनी नियोजन नेमके कसे केले, याविषयी अनेक तर्कवितर्क इतिहासकारांनी मांडले आहेत. तथापि, या घटनेचा चाळीस वर्षे अभ्यास करणारे दुर्गमहर्षी प्रमोद मांडे याविषयी सचित्र मार्गदर्शन करतात. त्यांचे महाराष्ट्रातील दुसरेच सादरीकरण येत्या मंगळवारी (दि. ३ जून) मराठ्यांची राजधानी असलेल्या सातार्‍यात होत आहे. आग्य्राला कडेकोट पहार्‍यात असणार्‍या शिवाजी महाराजांनी अखेर स्वत:ची सुटका कशी करून घेतली, हे अजूनही अनेकांना कोडेच आहे. इतिहासात ही घटना अत्यंत अकल्पित अशी मानली जाते. त्यामुळे इतिहासकारांकडून त्याविषयी वर्णनेही अधिक केली गेली. त्यामुळे अनेक यक्षप्रश्न सामान्य इतिहासप्रेमींच्या मनात कायमचे घर करून राहिले. या प्रश्नांची सचित्र उत्तरे मंगळवारी सायंकाळी सहा वाजता सातारकरांना शाहू कला मंदिरात मिळणार आहेत. येथील ‘गडवाट’ संस्थेने हा सादरीकरणाचा कार्यक्रम आयोजित केला असून, तो विनामूल्य आहे, अशी माहिती अजय जाधवराव यांनी दिली. आग्य्राहून शिवाजी महाराजांनी करून घेतलेली सुटका हा अत्यंत थरारक प्रसंग असून, इतिहासात या प्रसंगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र या घटनेविषयी अनेकांना पूर्णपणे माहिती नसते. छत्रपती शिवरायांनी औरंगजेबाच्या पोलादी पहार्‍यातून रक्ताचा एक थेंबही न सांडता करून घेतलेल्या सुटकेबाबत अनेक अफवा आहे. मुस्लिम बखरकारांसह अनेकांनी ही घटना मांडताना अनेक अतर्क्य घटनांचा समावेश त्यात केला आहे. वस्तुत: छत्रपती शिवरायांनी आपली सुटका करून घेण्यासाठी आखलेली योजना अत्यंत शिस्तबद्ध होती. त्याआधी त्यांनी घेतलेली खबरदारी, सवंगड्यांना बाहेर काढताना वापरलेल्या क्लृप्त्या समजून घेण्याजोग्या आहेत. यासंदर्भात इतिहासप्रेमींच्या मनात असलेल्या अनेक शंकाकुशंका आणि प्रश्नांना उत्तरे देताना प्रमोद मांडे काही अपरिचित आणि काही परिचित घटनांचे नेमके चित्र सादर करणार आहेत. या सादरीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन ‘गडवाट’च्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Satarakar will experience 'Thakur of freedom from fire'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.