ताजमहलाच्या सुरक्षेसाठी सातारी जवान!

By Admin | Updated: August 9, 2015 23:43 IST2015-08-09T23:43:40+5:302015-08-09T23:43:40+5:30

दहशतवाद्यांपासून रक्षण : औद्योगिक सुरक्षा दलाच्या माध्यमातून खडा पहारा

Satara youth to protect Taj Mahal! | ताजमहलाच्या सुरक्षेसाठी सातारी जवान!

ताजमहलाच्या सुरक्षेसाठी सातारी जवान!

दत्ता यादव - सातारा हा शूरवीरांचा आणि सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. अशा या जिल्ह्यातील अनेक सैनिकांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. हीच सैनिकी परंपरा कायम जपत सातारा जिल्ह्यातील सुपुत्र देशसेवेसाठी सदैव तत्पर असतात. सध्या दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या ताजमहलच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील दोन जवानांचा समावेश आहे. त्यामुळे ताजमहलची सुरक्षा सातारा तटबंदीने मजबूत झाली आहे.देशातील प्रमुख वास्तू व प्रेक्षणीय स्थळांना दहशतवाद्यांपासून धोका आहे. त्यामुळे देशातील सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या असून, खबरदारीचे उपाय म्हणून प्रेक्षणीय स्थळांना कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जगातील सातव्या आश्यर्चामध्ये आग्रा येथील ताजमहलचा समावेश आहे. हे प्रेक्षणीय स्थळही दहशतवाद्यांच्या हिटलिटस्टवर असल्याने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची एक तुकडी सशस्त्र खडा पहारा देत आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील दोन जवानांचा समावेश असून, ताजमहलची सुरक्षा करण्याचे भाग्य आम्हाला लाभल्याचे त्यांनी सांगितले.
एके ४७ हातात घेऊन ताजमहलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सातारा जिल्ह्यातील जायगाव, ता. खटाव येथील सागर देशमुख आणि पुसेसावळी, ता. खटाव येथील सागर ढाणे यांची नेमणूक करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून हे दोघे आपल्या तुकडीसमवेत ताजमहलची सुरक्षा करत आहेत. आठ तासांच्या ड्यूट्या त्यांना देण्यात आल्या आहेत. अदलून-बदलून ड्यूटी झाल्यानंतर त्याच ठिकाणी ते वास्तव करत आहेत.
सागर देशमुख हे अविवाहित असून, सहा महिन्यांनंतर ते गावी सुटीवर येतात. ताजमहल हे जागतिक पर्यटनस्थळ असल्याने अनेक देशांतून पर्यटक या ठिकाणी भेटी देतात. त्यामध्ये महाराष्ट्रामधूनही मोठ्या संख्येने पर्यटक येत असल्याचे सागर देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
ताजमहलचे फोटो काढताना काही पर्यटक मराठीतून बोलतात. त्यावेळी आपसूकच आमचे पाय त्यांच्याकडे वळतात. आम्हीही मराठीतून बोलल्यामुळे त्यांना आपुलकी वाटते. एकमेकांची चौकशी आणि ओळख झाल्यानंतर काही पर्यटक आम्हाला सोबत फोटो काढण्याची विनंती करतात; परंतु सुरक्षिततेचा प्रोटोकॉल सांभाळावा लागतो. त्यामुळे फोटो काढण्यास त्यांना नकार द्यावा लागतो. मिल्ट्रीचा रुबाबदार ड्रेस, हातात एके ४७ रायफल पाहून आपल्या मराठी बांधवांच्या अभिमान वाटतो. असे पर्यटक त्यांना बोलून दाखवतात.

ताजमहलसारख्या वास्तूचे संरक्षण करण्याची जबाबदारी माझ्यासारख्या मराठी सैनिकाला मिळाली. हे मी माझे भाग्य समजतो. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलामध्ये अनेक मराठी तरुण मोठ्या उत्साहाने दाखल होत असून, एक मराठी माणूस म्हणून मला याचा अभिमान वाटतो.
- सागर देशमुख (‘सीआयएसएफ’चा जवान)

Web Title: Satara youth to protect Taj Mahal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.