महाराष्ट्र शासनाने मोटरवाहन अधिनियम १९८८ कलम ६६ उपकलम ३ खंड एनचा वापर करून एसटीला १२ जून २०२० पासून मालवाहतूक करण्याची परवानगी दिली. त्यामुळे महामंडळाने जुन्या गाड्यांचे रूपांतर ट्रकमध्ये मालवाहतूक सुरू केली आहे. यासाठी एसटीच्या रचनेत बदल घडवून आणले. प्रवासी बसत असलेल्या ठिकाणी बंधिस्त डबा केला. एसटी महामंडळाने आजवर केवळ माणसांची वाहतूक केली. पण आता मालवाहतूक हा कर्मचारी आणि समाजासाठी नवीनच प्रयोग होता. त्याला कितपत यश येईल कोणालाही माहिती नव्हते. पण साताऱ्याचे विभाग नियंत्रक सागर पळसुले ठरावीक अधिकाऱ्यांना घेऊन लॉकडाऊनमध्ये औद्योगिक वसाहतीत फिरत होते. कंपन्यांच्या व्यवस्थापनाशी वारंवार बैठका घेऊन मालवाहतूक करण्यासाठी पटवून देत होते. तर काहीजण मालवाहतूक करणाऱ्या कंपन्यांशी संपर्क साधून हा व्यवसाय कसा चालतो, यातील बारकावे टिपण्याचा प्रयत्न करत होते.
यामुळे साताऱ्यातील व्यापाऱ्यांनाही मालवाहतुकीसाठी नवा पर्याय मिळाला. लोणंदमधील कांदा, वाई, कोरेगाव, कऱ्हाड तालुक्यातून कृषी माल राज्याच्या विविध भागात धावू लागल्या आहेत. आता तर सिमेंट पोती, औषधे, फळांची त्यासह अनेक वस्तूंची वाहतूक केली जात आहे. त्यातून उत्पन्नाचा नवा स्त्रोत राज्य परिवहन महामंडळाला मिळाला आहे. समाधानकारक उत्पन्न मिळत नसले तरी अपेक्षित उत्पन्न मिळविण्याचे प्रयत्न कामगार करीत आहेत.
चौकट :
ऑक्सिजन वाहतुकीचा उचलला भार
कोरोना काळात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवत होता. ऑक्सिजनअभावी लाखो कोरोनाबाधित रुग्ण एक एक श्वास घेण्यासाठी झगडत होता. त्यातच राज्याच्या अनेक भागात ऑक्सिजन निर्मिती करणारे प्रकल्प तेव्हा नव्हते. त्यामुळे मोठे प्रकल्प असलेल्या ठिकाणाहून ऑक्सिजन टँकर भरून प्रत्येक जिल्ह्यात पाठवले जात होते. मात्र, यासाठी टँकर घेऊन जाण्यासाठी राज्यातील वाहतुकीचा अनुभव असलेल्या चालकांची कमतरता भासत होती. त्याचवेळी संबंधित चालकाची कामाप्रती निष्ठा असणेही तितकेच महत्त्वाचे होते. त्यामुळे प्रशासनाने एसटी महामंडळाकडे अनुभवी आणि काम करण्यास तयार असलेल्या चालकांची नावे मागितले होते. तेव्हा क्षणाचाही विचार न करता अनेक चालक स्वत:हून पुढे आले. त्यामुळे प्रशासनावरील मोठा ताण कमी झाला होता.
चौकट :
स्टेअरिंग धरणारे हात विकू लागले फळे
कोरोनामुळे एसटी महामंडळाचे उत्पन्न घटले होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना चार चार महिने पगार झालेला नव्हता. अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली. पण यामुळे कर्मचारी डगमगले नाही. काही कर्मचाऱ्यांनी चुळबूळ सुरू केली. पण धाडसी आणि कधीही हार मानायची नाही, असा निर्धार केलेले कर्मचाऱ्यांनी अन्य पर्याय निवडले. हातात स्टेअरिंग धरणारे, तिकीट फाडणाऱ्या कर्मचाऱ्यांनी फळे, भाजीपाला विकण्याचा पर्याय निवडला. त्यामुळे कुटुंब उभारण्यासाठी मदत झाली.