सातारा सावरतोय; बरे होण्याचे प्रमाण ८३ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:41 IST2021-05-21T04:41:49+5:302021-05-21T04:41:49+5:30
सातारा : जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असतानाच सातारा शहरवासीयांसाठी एक दिलासादायक वृत्त आहे. शहरात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ...

सातारा सावरतोय; बरे होण्याचे प्रमाण ८३ टक्के
सातारा : जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असतानाच सातारा शहरवासीयांसाठी एक दिलासादायक वृत्त आहे. शहरात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.७० टक्के असून, मृत्युदरही १.४ टक्क्यांवर आला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असले तरी नागरिकांकडून शासन नियमांचे सातत्याने उल्लंघन केले जात असल्याने धोका अजूनही टळलेला नाही.
राज्यासह सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचा वेग अधिक आहे. गेल्या दीड महिन्यांत कोरोना बाधितांच्या व मृतांच्या संख्येने गतवर्षीचे सर्व उच्चांक मोडीत काढले आहेत. सद्य:स्थितीला जिल्ह्यात कोरोनाचे सुमारे २० हजार रुग्ण सक्रिय असून, यापैकी तब्बल १७ हजार रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. जिल्ह्यातील सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये बेडची कमतरता असल्याने रुग्णांना घरातून उपचार घेण्याशिवाय कोणताच पर्याय उरलेला नाही. असे असले तरी घरातून उपचार घेऊन कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्याही हळूहळू वाढू लागली आहे.
एकीकडे कोरोना रुग्ण वाढत असताना सातारा शहर वासीयांसाठी मात्र दिलासादायक बातमी समोर आली आहे. शहरात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.७० टक्के इतके झाले आहे, तर मृत्युदरही १.४ टक्क्यांवर आला आहे. मार्च २०२० पासून आजअखेर शहरात एकूण १६० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असतानाच कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढू लागल्याने प्रशासनाला देखील दिलासा मिळाला आहे.
(चौकट)
गृहविलगीकरणात १६०० रुग्ण
सातारा शहराचा विचार केल्यास शहरात सध्या एक हजार ८३३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी एक हजार ६०० रुग्ण गृहविलगीकरणात, तर २३३ रुग्ण दवाखान्यातून उपचार घेत आहे. शहराचा आवाका पाहता कोरोना संक्रमण नियंत्रणात असले तरी गृहविलगीकरणात उपचार घेणारे रुग्ण व बाजारपेठेतील गर्दी संक्रमण वाढीस कारणीभूत ठरू लागली आहे. नागरिकांनी शासन नियमांचे उल्लंघन करण्याऐवजी त्याचे पालन केल्यास येत्या काही दिवसांत कोरोना संक्रमण रोखण्यास मोठी मदत होऊ शकते.