सातारा : मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज
By Admin | Updated: October 17, 2014 00:38 IST2014-10-16T23:30:19+5:302014-10-17T00:38:31+5:30
विधानसभा निवडणूक : मतमोजणी ठिकाणे निश्चित

सातारा : मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज
सातारा : जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांचा नवीन आमदार कोण असेल, यावर रविवार, (दि. १९) दुपारी बारा वाजेपर्यंत शिक्कामोर्तब होणार आहे. दरम्यान, मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मतमोजणी संपेपर्यंत मुख्यालय सोडू नये, असे आदेश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघांसाठी बुधवारी (दि. १५) मतदान झाले. ८७ उमेदवार रिंगणात होते. मतदानाची एकूण टक्केवारी ६७.६४ इतकी राहिली. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील लढत चौरंगी झाल्यामुळे निकाल काय असेल, याची उत्सुकता अनेकांना लागली आहे. आठ विधानसभा (पान मतदारसंघांची मतमोजणी निश्चित केलेल्या ठिकाणी होणार आहे. प्रत्येक मतदारसंघातील मतमोजणी फेऱ्या किती असतील, याची निश्चिती मात्र अजून झाली नव्हती. शनिवार, दि. १८ रोजी दुपारपर्यंत फेऱ्या निश्चित होण्याबरोबरच किती टेबलची मांडणी असेल, याचा आराखडा तयार होईल, अशी माहिती निवडणूक शाखेतून देण्यात आली.
रविवारी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. पहिल्यांदा एका टेबलवर पोस्टल मतांची मोजणी होणार आहे. याचा निकाल पहिल्या अर्ध्या तासातच अपेक्षित आहे.
दरम्यान, बुधवारी सायंकाळी सहा वाजता मतदान संपल्यानंतर प्रत्येक मतदान केंद्रातून कडक बंदोबस्तात ‘ईव्हीएम’ मतमोजणी केंद्राकडे रवाना करण्यात आली. ज्या ठिकाणी ‘ईव्हीएम’ ठेवण्यात आली आहेत तेथे कडक सुरक्षाव्यवस्था पुरविण्यात आली आहे. सीआरपीएफ, स्थानिक पोलीस आणि सीसीटीव्ही, अशी यंत्रणा येथे आहे.
त्याचबरोबर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी येथे कर्मचारी नियुक्त केले आहेत. दररोज प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी आणि तहसीलदारांनी मतमोजणी केंद्राला भेट देणे बंधनकारक केले आहे. (प्रतिनिधी)
येथे होणार मतमोजणी
फलटण : नवीन शासकीय गोदाम, शासकीय विश्रामगृह
वाई : श्रीनिवास मंगल कार्यालय, एमआयडीसी
कोरेगाव : वखार महामंडळ गोदाम, जळगाव
माण : बाजार समिती गोदाम, दहिवडी
कऱ्हाड दक्षिण : महाराष्ट्र वखार महामंडळ गोदाम नं. १
कऱ्हाड उत्तर : शासकीय अन्नधान्यसाठा गोदाम
पाटण : संत निरंकारी भवन, म्हावशी
सातारा : शाहू स्टेडियम, सातारा