साताऱ्यात फिजिकल डिस्टन्स उरला नावाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:39 IST2021-03-20T04:39:09+5:302021-03-20T04:39:09+5:30
सातारा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत; परंतु नागरिकांसह व्यापारी विक्रेत्यांकडून शासन नियम ...

साताऱ्यात फिजिकल डिस्टन्स उरला नावाला
सातारा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत; परंतु नागरिकांसह व्यापारी विक्रेत्यांकडून शासन नियम पायदळी तुडविले जात आहेत. शहरातील सर्व किराणा दुकाने, भाजी मंडई गर्दीने गजबजून जात असून फिजिकल डिस्टन्सचा अक्षरशः फज्जा उडत आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसात तब्बल ६००हून अधिक रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना राबविल्या जात आहेत; परंतु नागरिकांचे सहकार्य मिळत नसल्याने आता प्रशासन कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. फिजिकल डिस्टन्सचे पालन करावे, मास्कचा नियमित वापर करावा असे प्रशासनाकडून सातत्याने सांगितले जात आहे. मास्क न वापरणाऱ्यांवर, गर्दी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईदेखील केली जात आहे. असे असतानाही नागरिक, व्यापारी, दुकानदार सर्वांकडून नियमांची पायमल्ली केली जात आहे.
शहरातील राजपथ, मोती चौक, प्रतापगंज पेठ, खणआळी, जुना मोटर स्टँड, ५०१ पाटी, पोवई नाका, राधिका रोड आदी ठिकाणी सकाळी नऊ वाजल्यापासून नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडत. शहरातील सर्वच किराणा दुकान गर्दीने गजबजून जात आहेत. काहीजण मास्कचा वापर न करताच खरेदीसाठी रांगा लावत आहेत. दररोज सकाळी बसस्थानकासमोर व राधिका रस्त्यावर भरणाऱ्या भाजी मंडईत अनेकजण विनामस्क वावरताना दिसतात. येथील गर्दी पाहिल्यानंतर फिजिकल डिस्टन्स म्हणजे काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
(पॉईंटर्स)
१. जिल्हाधिकाऱ्यांनी बाजारपेठेवर वेळेचे निर्बंध घातले आहे; परंतु नागरिकांकडून रात्री ९ नंतरही दुकाने सुरू ठेवली जात आहे.
२. दुकानात पाचपेक्षा अधिक नागरिक नसावेत असे बंधन असताना दुकाने गर्दीने गजबजून गेलेली असतात.
३. फिजिकल डिस्टन्स पाळला जावा यासाठी एकाही दुकानासमोर सुरक्षित अंतराचे पट्टे आखण्यात आले नाहीत
४. बाजारपेठेत व भाजी मंडईत सर्वाधिक गर्दी होत असून, नागरिकांकडून मास्कचा वापरही केला जात नाही.
५. रात्री ११ ते पहाटे ६ या वेळेत संचारबंदी असतानादेखील नागरिक, वाहनधारक शहरात निर्धास्त वावरतात.
६. ही परिस्थिती अशीच राहिली व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला तर प्रशासनाला लॉकडाऊन शिवाय पर्याय उरणार नाही.
फोटो मेल : भाजीमंडई
साताऱ्यातील सेव्हनस्टार इमारतीसमोर दररोज सकाळी भरणाऱ्या भाजी मंडईत फिजिकल डिस्टन्सचा असा फज्जा उडत आहे. अनेक विक्रेते मास्कचा वापरही करत नाहीत. (छाया : सचिन काकडे)
लोगो : रियालिटी चेक