सातारा : खंडणी, खासगी सावकारी अन् मारामारीचे विविध गुन्हे दाखल असलेल्या नगरसेवक बाळू खंदारे याला मोक्का लावण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.नगरसेवक विनोद ऊर्फ बाळू खंदारे (वय २८, रा. मल्हार पेठ, सातारा) याच्या नावावर दहाहून अधिक विविध गुन्हे दाखल आहेत. खासगी सावकार खंड्या धाराशिवकर याच्या टोळीच्या मदतीने बाळू खंदारेने पैसे उकळल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तसेच उद्योजकांना खंडणी मागणे, जीवे मारण्याची धमकी, मारामारी असे गुन्हे त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. अलीकडे सुरुचि राडाप्रकरणात त्याला अटक झाली आहे. सध्या तो या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे.दरम्यान, बाळू खंदारे अल्पवयीन असल्यापासून त्याच्यावर मारामारी, दहशत माजविण्याचे गुन्हे दाखल होते. ज्या दिवशी त्याला अठरा वर्षे पूर्ण झाली. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच्यावर मारामारीचा गुन्हा दाखल झाल्याचे पोलीस सांगतायत. त्यावेळचा एक किस्सा पोलिसांच्या अद्यापही स्मरणात आहे. रविवार पेठेमध्ये दोन गटांत मारामारी झाली होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणात दहशत माजविण्यात आली होती. त्यावेळचे शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रामदास शिंदे यांनी बाळू खंदारेला बदडतच भर रस्त्यातून पोलीस ठाण्यात आणले होते.खंदारेला अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर तो राजकारणात सक्रिय झाला. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडीकडून पहिल्याच प्रयत्नात तो नगरसेवक म्हणून पालिकेत निवडून आला. तीन ते चार सभांना तो पालिकेत हजर राहिला असेल, अन्यथा इतर सर्व दिवस त्याचे पोलिसांपासून लपण्यातच गेले. आता तर त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अशाप्रकारची कारवाई झालेला सातारा पालिकेच्या इतिहासातील बहुदा हा पहिलाच नगरसेवक असेल.
साता-यातील नगरसेवक बाळू खंदारेला मोक्का, पोलिसांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 18:35 IST