साताऱ्याच्या वैद्यकीय महाविद्यालयाला अखेर ‘ग्रीन सिग्नल’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:42 IST2021-09-18T04:42:05+5:302021-09-18T04:42:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस यांचे आघाडी सरकारच्या काळात राज्य सरकारची मान्यता, महायुतीच्या काळात महाविद्यालयाच्या जागेचे हस्तांतरण ...

साताऱ्याच्या वैद्यकीय महाविद्यालयाला अखेर ‘ग्रीन सिग्नल’!
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस यांचे आघाडी सरकारच्या काळात राज्य सरकारची मान्यता, महायुतीच्या काळात महाविद्यालयाच्या जागेचे हस्तांतरण अन् पुन्हा शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचा ग्रीन सिग्नल, असा सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीचा दीर्घ प्रवास झाला. आता केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाची औपचारिक मान्यता मिळाल्यानंतर महाविद्यालय उभारणीचा श्रीगणेशा केला जाणार आहे.
सातारकरांचे स्वप्न असलेल्या सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची राज्य शासनाने अखेर मुहूर्तमेढ रोवली. सातारा शहरालगत कृष्णा खोरे महामंडळाकडून ताब्यात घेण्यात आलेल्या ६४ एकर जागेवर हे महाविद्यालय उभारले जाणार आहे. तब्बल ४९५ कोटी रुपयांच्या खर्चाला वित्त विभागाने मंजुरी दिली तसेच २ कोटी ९८ लाख ५३ हजार ७९८ रुपयांच्या साहित्य खरेदीला देखील मंजुरी देण्यात आली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुतलेल्या चाकांना गती मिळाल्याचे चित्र आहे.
महाविद्यालयाच्या उभारणीवरून मधल्या काळात श्रेयवाद उफाळला होता. अनेक नेत्यांचे महाविद्यालयाच्या उभारणीच्या कामात हातभार लागला आहे. सुरुवातीला सातारा तालुक्यातील खावली येथील शासकीय जागेवर महाविद्यालय उभारले जाणार होेते, मात्र ही जागा जिल्हा रुग्णालयापासून लांब असल्याने शहरालगतची जागा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. योगाने कृष्णा खोरे महामंडळाची शासकीय जागा उपलब्ध झाली. जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षण विभागांमध्ये समन्वय घडवून ही जागा महाविद्यायासाठी उपलब्ध करता आली आहे. जी गोष्ट स्वप्नवत होती, ती आता साकारली जाणार असल्याने सातारकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या समितीने जुलै महिन्यामध्ये महाविद्यालयाच्या कामकाजाची तपासणी केली. त्याच कालावधीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे वर्ग असलेल्या क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात रुग्णांची संख्या प्रचंड होती. जम्बो कोविड हॉस्पिटलमध्येदेखील रुग्ण मोठ्या प्रमाणात होते. हीच परिस्थिती महाविद्यालयाच्या मान्यतेसाठी पोषक ठरली, असे म्हणता येईल. केंद्राच्या पथकाने ही परिस्थिती पाहून महाविद्यालय उभारणीचा सकारात्मक निर्णय घेतला आहे.
१,०७२ पदे भरली जाणार
राज्य शासनाने ९ वर्षांपूर्वी दिली मंजुरी
या महाविद्यालयासाठी राज्य शासनाच्या वैद्यकीय व औषधी द्रव्ये विभागाने ३१ जानेवारी २०१२ मध्ये मंजुरी दिली होती. त्यानंतर जागा उपलब्ध करण्यात वेळ गेला. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये त्याला गती आली.
महाविद्यालयाचे कामकाज चार ठिकाणीसातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे फलक चार ठिकाणी लावण्यात आले आहेत. सातारा शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालय तीन वर्षांच्या करारावर वैद्यकीय शिक्षण विभागाकडे देण्यात आलेले आहे. वर्ये येथील सावकर मेडिकल कॉलेजमध्ये लॅब तसेच वर्ग घेण्यात येणार आहेत. तर सातारा जम्बो कोविड सेंटरदेखील या महाविद्यालयाच्या माध्यमातून चालवण्यात येत आहे. या चार ठिकाणी सध्या सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कामकाज सुरू आहे.
जोड आहे..