सातारा, महाबळेश्वरला झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 23:06 IST2018-11-04T23:06:10+5:302018-11-04T23:06:15+5:30
सातारा : सकाळपासून भरून आलेल्या ढगांनी दुपारच्या सुमारास महाबळेश्वरला तर सायंकाळी सातारा शहराला झोडपले. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. ...

सातारा, महाबळेश्वरला झोडपले
सातारा : सकाळपासून भरून आलेल्या ढगांनी दुपारच्या सुमारास महाबळेश्वरला तर सायंकाळी सातारा शहराला झोडपले. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. तर या पावसामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची मात्र चांगलीच धावपळ उडाली. साताऱ्यात तर ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू होता.
सातारा शहराबरोबर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत होते. मात्र, पाऊस पडेल असे वाटत असतानाही हुलकावणी मिळत होती. रविवारी तर सकाळपासूनच सातारा शहर व परिसरात आभाळ भरून आले होते. त्यामुळे पाऊस पडणार, असे चित्र होते. सायंकाळी साडेचारच्या सुमारास आभाळ भरून आले. त्यामुळे अंधार पडू लागला आणि त्यानंतर बघता-बघता पावसाचे टपोरे थेंब पडू लागले. मात्र, पावणेपाचनंतरच पावसाने खरा जोर धरला. सुमारे १५ मिनिटे पाऊस पडला. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात पावसाने सातारकरांना चांगलेच झोडपले. अनपेक्षितपणे आलेल्या या पावसाने खरेदीसाठी बाहेर पडलेल्या सातारकरांची मात्र चांगलीच धावपळ उडाली. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी थांबावे लागले. तर रस्त्याच्या बाजूला विक्री करणाºया छोट्या व्यावसायिकांना सर्व साहित्य गोळा करताना अडचणी निर्माण झाल्या. या पावसामुळे रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते.