कोरोना लसीकरणात सातारा जिल्हा पाचव्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:20 IST2021-02-05T09:20:16+5:302021-02-05T09:20:16+5:30

सातारा : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला आरोग्य कर्मचाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, राज्यात सातारा जिल्हा हा पाचव्या क्रमांकावर आहे. जिल्हा ...

Satara district ranks fifth in corona vaccination | कोरोना लसीकरणात सातारा जिल्हा पाचव्या क्रमांकावर

कोरोना लसीकरणात सातारा जिल्हा पाचव्या क्रमांकावर

सातारा : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला आरोग्य कर्मचाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, राज्यात सातारा जिल्हा हा पाचव्या क्रमांकावर आहे. जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वच्छता कर्मचाऱ्यांपासून ते वैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वच जण लस प्राधान्याने घेत आहेत.

कोरोनाच्या गंभीर आजारावर लस उपलब्ध झाल्यावर साऱ्यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. शासनाच्या निर्देशानुसार सर्व प्रथम आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना ही लस दिली जात आहे. जिल्ह्यात २५ हजार कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात कोविशिल्ड या लसीचे तब्बल ३० हजार डोस प्राप्त झाले होते. जिल्ह्यातील १८ केंद्रांवर लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. पहिल्या दिवशी ९६७ जणांनी लस घेतली. त्यानंतर रोज एक हजार जणांना लस देण्यात सुरुवात झाली. डोस वाया जाऊ नये म्हणून आदल्या दिवशी लस कोण घेणार आहे, त्यांची यादी तयार करून त्यांना बोलविण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकही डोस वाया गेला नाही. अत्यंत सूक्ष्म नियोजन आरोग्य विभागाने केले आहे.

चौकट : लसीकरणात महिलांचे प्रमाण

लसीकरणासाठी केवळ पुरुषच नाहीत तर महिलांचाही सहभाग चांगला आहे. आरोग्य विभागातील परिचारिका, डॉक्टर महिला लस घेण्यात अग्रेसर आहेत. विशेष म्हणजे सर्वाधिक परिचारिकांचा सहभाग लस घेण्यामध्ये चांगला आहे. एकाच दिवशी ४५८ परिचारिकेंनी लस घेतली. इतर महिला कर्मचारीही लस घेत आहेत.

चौकट : डोसचा दुसरा साठा जिल्ह्याला कधी मिळाला?

१) जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात तब्बल २५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेण्यासाठी नोंद केली होती. ३० हजार डोस उपलब्ध झाले होते. जिल्ह्यातून लस घेण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहून दुसरा डोसही २४ हजार ५०० जिल्ह्यासाठी उपलब्ध झाला.

२) जिल्ह्यातील नऊ केंद्रांमध्ये ही लस देण्यात येत आहे. काही जणांचा पहिल्या टप्प्यातील लस घेऊन महिना होत आला आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना दुसरा डोसही देण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचे नियोजन सुरू झाले आहे.

३) सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस पूर्ण देण्यासाठी अजून एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यानंतरच मग सर्वसामान्य नागरिकांना लस देण्याचा विचार जिल्हा प्रशासन करत आहे.

कोट :

आरोग्य कर्मचाऱ्यांकडून लस घेण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लसीची रिअ‍ॅक्शन कोणालाही आली नाही. या लसीमुळे प्रतिकारशक्ती वाढणार आहे. याचे महत्त्व आरोग्य कर्मचाऱ्यांना चांगले माहीत आहे.

-डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा

चौकट : कुठे किती लसीकरण

धुळे १०८.७

अमरावती १०६.०

बीड ९९.०

वर्धा ९६.५

सातारा ९३.९

जालना ९०.२

Web Title: Satara district ranks fifth in corona vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.