सातारा जिल्हा होरपळतोय..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:29 IST2019-04-29T22:29:41+5:302019-04-29T22:29:57+5:30
सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असून, सोमवारी जिल्ह्याचे तापमात ४०.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. ...

सातारा जिल्हा होरपळतोय..!
सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असून, सोमवारी जिल्ह्याचे तापमात ४०.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. गेल्या सहा दिवसांपासून पारा चाळीशी पार गेल्याने सातारकर पुरते हैराण झाले आहेत. रविवारी जिल्ह्याचे तापमान ४२.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले असून, ते आतापर्यंतचे उच्चांकी तापमान असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यातील सर्वच ठिकाणचे तापमान गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाढले आहे. सरासरी चाळीस अंश सेल्सिअसचा पल्लाही पाऱ्याने ओलांडला आहे. सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत असल्याने दुपारनंतर नागरिकांचे घराबाहेर पडणेही बंद झाले आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्ते व रहदारीची ठिकाणे दुपारच्या सुमारास ओस पडत आहेत.
जिल्ह्याचे यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमान रविवारी नोंदविण्यात आले. कमाल तापमानाची ४२.१ अंश तर किमान २६.६ अंश सेल्सिअस इतकी नोंद करण्यात आली आहे. सोमवारी पारा दोन अंशांनी उतरून ४०.६ अंशांवर स्थिरावला. दुपारच्या वेळेस आकाशात ढग दाटून आल्याने उन्हाची दाहकता कमी जाणवली. वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांना वैशाख वणव्याची आठवण येत असून, उकाड्यामुळे रसवंतीगृह, आईस्क्रीमची दुकाने गर्दीने बहरून जात आहेत.
डोळेच फक्त उघडे : कडक उन्हाच्या गरम झळा त्रास देत आहेत. श्वासोच्छवासातून गरम हवा गेल्याने डोके दुखणे, कोरडी सर्दी होण्याचे आजार जडत आहेत. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांना जाणाºया तरुणी, शासकीय कार्यालये, दुकानांमध्ये काम करणाºया महिला घरातून बाहेर पडताना स्टोलने चेहरा झाकून घेत आहेत. केवळ डोळेच उघडे ठेवले जात आहेत. त्यामुळे काहीअंशी का होईना उन्हापासून बचाव करता येत असल्याचा या तरुणींचा अनुभव आहे. दुचाकीवरून जाणाºया महिलाही स्कार्पने तोंड झाकत आहेत. त्यामुळे उष्माघाताचा त्रासही जाणवत नाही.
आईच्या पदरात लेकरू
थंड वातावरणासाठी प्रसिद्ध असलेला कूल सातारा सध्या तापमानवाढीमुळं ‘हॉट’ बनला आहे. सरासरी ४१ अंशांवर तापमानाची नोंद होत असल्याने कडक उन्हामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. या माउलीने आपल्या बाळालाही पदराखाली घेतले आहे.
उष्माघात टाळण्यासाठी हे उपाय महत्त्वाचे
सातारा : जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली असून, वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचे प्रमाणही वाढत आहे. उष्माघात झाल्यानंतर थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैन व अस्वस्थता, बेशुद्धावस्था आदी लक्षणे दिसून येतात. उष्माघात जीवावर बेतू नये, यासाठी नागरिकांनी खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. काही घरगुती उपाययोजना केल्यास उष्माघातापासून बचाव होऊ शकतो.
उष्माघात होऊ नये, यासाठी वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे.
कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावी.
उष्णता शोषून घेणारे कपडे वापरावेत. काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नयेत. सैल, पांढºया रंगाचे कपडे वापरावेत.
दिवसभरात जास्तीत-जास्त पाणी प्यावे. उन्हामध्ये काम करताना थोडी विश्रांती घ्यावी.
उष्माघाताची लक्षणे दिसू लागल्यास ताबडतोब काम थांबवावे.
उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, टोपी यांचा वापर करावा.
उष्ण पदार्थ खाणे टाळावे, शक्यतो पहाटे व सायंकाळीच चालण्यासाठी घराबाहेर पडावे.