खटाव (सातारा) : अवघ्या पंधरा दिवसांवर गणेश उत्सव आला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या मंडळाच्या नोंदी धर्मादाय आयुक्ताकडे करून घेणे आवश्यक आहेच.
राज्यात सर्वत्र कर्णकर्कश आवाजात ध्वनिक्षेपक यंत्रणा लावण्यावर बंदी आहे. त्याचे काटेकारपणे पालन करत सामाजिक उपक्रम राबवून उत्सव साजरा करा, असे आवाहन पुसेगावचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी केले. खटावमध्ये आयोजित सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी सरपंच रत्नप्रभा घाडगे, उपसरपंच बबनराव घाडगे, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप विधाते, माजी पंचायत समिती सदस्य मधुकर पाटोळे, मनोज देशमुख, रसुलभाई मुल्ला, रमेश शिंदे, दिलीप जाधव, सुभाष शिताळे यांच्यासह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.घोडके म्हणाले, जिल्ह्यात खटाव ग्रामपंचायतीने घेऊन तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत असताना कायद्याचे कोठेही उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी सर्वांनी घेणे गरजेचे आहे.