राष्ट्रवादीच्या दादा गटाचे सातारा, जावळीचे कारभारी ठरले; शहराध्यक्ष, तालुकाध्यक्षपदी कोणाची वर्णी..जाणून घ्या
By नितीन काळेल | Published: January 8, 2024 05:53 PM2024-01-08T17:53:12+5:302024-01-08T17:53:43+5:30
शहराध्यक्षपदी बाळासाहेब बाबर, तालुकाध्यक्षपदी वाईकर अन् चिकणे
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्याअजित पवार गटाच्या पदाधिकारी निवडींना सुरुवात झाली असून सातारा तालुकाध्यक्षपदी शशिकांत वाईकर आणि जावळी अध्यक्षपदी साधू चिकणे यांची निवड करण्यात आली आहे. तर सातारा शहराध्यक्षपदी अॅड. बाळासाहेब बाबर यांची वर्णी लागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मान्यतेनुसार विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी करण्यात आल्या. तर जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर आणि कार्याध्यक्ष अमित कदम यांच्या अध्यक्षतेखाली निवडी पार पडल्या आहेत. सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी निवडी जाहीर करुन पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
पक्षाच्या सातारा तालुकाध्यक्षपदी शशिकांत वाईकर, जावळी तालुकाध्यक्षपदी साधू चिकणे यांची निवड करण्यात आली. याबाबत त्यांना नियुक्तीपत्रही देण्यात आले आहे. तसेच पक्षाच्या इतर विभागांच्या निवडीही जाहीर झाल्या आहेत. त्यानुसार महिला आघाडीच्या सातारा शहराध्यक्षपदी संगिता देशमुख, अल्पसंख्यांक विभाग सातारा तालुकाध्यक्षपदी शमशुद्दीन सय्यद (कोंडवे), ओबीसीच्या विभागाच्या सातारा शहराध्यक्षपदी संजय बनकर यांची निवड करण्यात आली आहे. तर सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपदी रवींद्र शेलार, कार्याध्यक्षपदी महेश पाटील आणि सातारा जिल्हा चिटणीसपदी प्रकाश कदम यांची निवड झाली आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास शिंदे, जावळी सहकारी बॅंकेचे संचालक योगेश गोळे, प्रकाश कोकरे, शिवाजीराव देशमुख, वैशाली सुतार, संदीप भोसले यांच्या उपस्थितीत या निवडी झाल्या.