सातारा शहराचा पारा १२ अंशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:16 IST2021-02-05T09:16:28+5:302021-02-05T09:16:28+5:30
पारा १२ अंशांवर सातारा : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यासह सातारा शहराच्या तापमानात घसरण झाली आहे. तापमान अचानक खालावल्याने पहाटे ...

सातारा शहराचा पारा १२ अंशांवर
पारा १२ अंशांवर
सातारा : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यासह सातारा शहराच्या तापमानात घसरण झाली आहे. तापमान अचानक खालावल्याने पहाटे व रात्रीच्या वेळी थंडीची तीव्रताही जाणवू लागली आहे. हवामान विभागाने बुधवारी साताऱ्याचे कमाल तापमान ३०.९, तर किमान तापमान १२.९ अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरातही थंडीची तीव्रता वाढू लागली आहे. बुधवारी येथील पारा १४ अंशांवर स्थिरावला. फेब्रुवारी महिना सुरू झाल्यापासून उन्हाच्या झळा बसत असताना अचानक थंडीत वाढ झाल्याने नागरिकांना हुडहुडी भरत आहे.
वाहतूक कोंडीमुळे
वाहनधारक त्रस्त
सातारा : शहरातील मोती चौक, खणआळी, पाचशे एक पाटी व तहसील कार्यालय परिसरात वाहतुकीची सातत्याने कोंडी होत आहे. खणआळी व पाचशे एक पाटी ही साताऱ्याची प्रमुख बाजारपेठ आहे. शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी या ठिकाणी बाजारहटासाठी नेहमीच रेलचेल सुरू असते. त्यामुळे हा परिसर गर्दीने कायम गजबजलेला असतो. खरेदीसाठी येणारे अनेक वाहनधारक आपल्या गाड्या रस्त्याकडेला लावत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनत आहे. तहसील कार्यालयातही पार्किंगसाठी जागा अपुरी पडत असल्याने मुख्य प्रवेशद्वाराजवळही गाड्या लावल्या जातात. त्यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत आहे.
भाजीपाला रस्त्यावर;
दुुर्गंधीचे साम्राज्य
सातारा : येथील बसस्थानकासमोर तसेच राधिका रस्त्यावर दररोज सकाळी ग्रामीण भागातील शेतकरी भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. अनेक शेतकरी रस्त्यावरच दुकाने थाटत असल्याने याचा वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. भाजी विक्री झाल्यानंतर काही शेतकरी उरलेला माल रस्त्याकडेला टाकून निघून जातात. हा कचरा कुजत असल्याने याच्या दुर्गंधीचा नागरिकांसह पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेने रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अथवा या ठिकाणी कचराकुंडीची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.