सातारा बनणार ‘एलईडी सिटी’

By Admin | Updated: March 16, 2015 00:07 IST2015-03-15T23:50:16+5:302015-03-16T00:07:43+5:30

पुणे विभागात पहिलाच उपक्रम : पालिकेची वर्षाला होणार सत्तर लाखांची बचत---लोकमत विशेष...

Satara to become 'LED city' | सातारा बनणार ‘एलईडी सिटी’

सातारा बनणार ‘एलईडी सिटी’

दत्ता यादव - सातारा   -बल्ब, ट्यूब ते ‘एलईडी’ व्हाया सोडीयम व्हेपर असा साताऱ्यातील पथदिव्यांचा प्रवास आत्तापर्यंत राहिला आहे. सध्या संपूर्ण शहरामध्ये ‘एलईडी’ दिवे बसविण्यात येणार असून, यामुळे आता सातारची ‘एलईडी सिटी’ म्हणून ओळख निर्माण होणार आहे. विशेष म्हणजे, सातारा पालिकेचा हा पुणे विभागातील पहिलाच उपक्रम असून, वर्षाला तब्बल पालिकेची सत्तर लाखांची बचत होणार आहे.पालिकेच्या वतीने तिजोरीमध्ये बचत होण्यासाठी अनेक चांगले उपक्रम राबविले जात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे सातारा ‘एलईडी सिटी’ करण्याचा. पूर्वी शहरामध्ये काही ठिकाणी सहा फुटांचे लोखंडी पथदिवे होते. या पथदिव्यावर एक छोटासा मिणमिणता बल्ब लावला जात होता. मात्र काळाच्या ओघात हे लोखंडी दिवे नामशेष झाले. उरल्या केवळ फक्त आठवणी. आजही काही लोक या लोखंडी खांबाकडे कुतूहलाने पाहतात.
सध्या शहरामध्ये सुमारे पाच हजार पथदिवे आहेत. काही ठिकाणी १५० वॉटचे अडीच हजार बल्ब आहेत. तर अडीचशे वॉटचे एक हजार दिवे आहेत. या एका बल्बची तब्बल साडेसहा हजार रुपये किंमत आहे. त्यामुळे हा बल्ब गेला तर त्याचा देखभाल खर्च जास्त होतो. साधारण सहा महिन्यांपर्यंत हा बल्ब टिकतो. तसेच महत्त्वाचे म्हणजे वीजबिलापोटी पालिकेला महिन्याला तब्बल बारा लाख रुपये भरावे लागत आहेत. म्हणजे, वर्षाला तब्बल एक कोटी ४४ लाख रुपये केवळ वीजबिलासाठीच खर्च होतायत. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीवर मोठा ताण येत आहे. सध्या वीजबचतीसाठी एलईडी दिव्यांचा वापर सर्रास ठिकाणी केला जातो. मात्र ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च लागणार असला तरी यातून पालिकेची आर्थिक बचत होणार आहे. शहरामध्ये एलईडी दिवे बसविल्यास वर्षाला तब्बल सत्तर लाखांची बचत होणार आहे. एलईडी दिवे हे कमी वॉटचे असतात. साठ ते ऐंशी वॉटचा दिवा जरी लावला तरी त्याचा प्रकाश चांगला पडतो. या दिव्यांचे वीजबिलही जास्त येत नाही. चाळीस ते साठ टक्के वीजबिल बचत होणार आहे. त्याचा देखभालीचा खर्चही कमी असतो. त्यामुळे सध्या एलईडी दिवे बसविण्याचा पालिकेने निर्णय घेतला आहे. काही जिल्ह्यांत व ग्रामीण भागामध्ये सध्या एलईडी दिवे दिसून येत असले तरी संपूर्ण शहर एलईडीने युक्त होणारे पुणे विभागातील सातारा हे पहिलेच शहर ठरणार आहे.

‘बीओटी’चा प्रस्ताव !
सातारा सिटी एलईडी करण्यासाठी सुरुवातीला पालिकेला खर्च झेपणार नाही. त्यामुळे बीओटी तत्त्वावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. संबंधित कंपनीला मिळणाऱ्या उत्पनातील काही वाटा पालिकेलाही मिळणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प राबविताना पालिकेला फारशा अडचणी येणार नाहीत. असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

शहरामध्ये ४८ मीटर बॉक्स आहेत. त्याच्यावर दिव्यांचे जादा कनेक्शन लावण्यात आले आहेत. त्यामुळे ओव्हरलोड होऊन वरचेवर लाईट बंद पडत आहेत. एलईडी दिव्यांमुळे त्या आता पडणार नाहीत.
-अभिजित बापट, मुख्याधिकारी, सातारा

‘एलईडी’चे काय फायदे
१) वीजबिल आता येतय त्यापेक्षा निम्म्याहून कमी येईल
२) देखभालीचा खर्च वाचणार
३) व्होल्टेज वाढले तरी बल्ब जाणार नाहीत
४) शॉर्टसर्किट होणार नाही
५) मीटरवर लोड कमी येणार

Web Title: Satara to become 'LED city'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.