सातारा होणार ‘ग्रीन सिटी’
By Admin | Updated: April 9, 2016 00:14 IST2016-04-08T23:17:25+5:302016-04-09T00:14:39+5:30
पर्यावरणाचा समतोल : रस्त्याकडेला लावली जाणार पाच हजारांहून अधिक झाडे

सातारा होणार ‘ग्रीन सिटी’
दत्ता यादव -- सातारा -‘एलईडी सिटी, स्वच्छ सुंदर,’ सातारा अशी एकापोठापाठ एक विकासकामे आपल्या नावावर कोरणाऱ्या सातारा पालिकेला आणखी एक मानाचा तुरा खोवण्याची संधी मिळाली आहे. संपूर्ण एलईडी सिटी करण्याचा मान सातारा पालिकेला मिळाला असतानाच आता सातारा ही ‘ग्रीन सिटी’ म्हणून ओळखली जाणार आहे. शहरातील रस्त्यांवर पाच हजारांहून अधिक झाडे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे अजिंक्यताऱ्यावरून सातारा हिरवागार दिसणार आहे.
केंद्र शासनाच्या ‘अमृत’ योजनेच्या माध्यमातून हा ग्रीन सिटीचा प्रोजेक्ट राबविण्यात येत असून, यासाठी सातारा पालिकेला तब्बल एक कोटीचा निधीही मंजूर झाला आहे. त्यामुळे सातारा ही ‘ग्रीन सिटी’ होण्यासाठी आता केवळ औपचारिकता बाकी आहे. तीस फुटांच्यावर रुंद असणारे रस्ते या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहेत. जवळपास शहरातील सर्वच रस्ते यासाठी पात्र ठरले असून, रस्त्याकडेला ही झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच ज्या ठिकाणी डिव्हाईडर असेल तेथेही रस्त्याच्या मध्यभागी झाडे लावण्यात येणार आहेत. यापूर्वी आपण हायवेवरून जाताना प्रवास अल्हाददायक वाटत होता; मात्र आता शहरामध्येही याची अनुभूती प्रत्येकाला मिळणार असल्याने सातारकरांच्या दृष्टीने ही एक अभिमानाची बाब ठरली आहे. ‘ग्रीन सिटी’चा उद्देश पर्यावरणाचा समतोल राखला जावा, हा असला तरी ही ‘ग्रीन सिटी’ पाहून ताजेतवाणे आणि निरोगी राहण्यासाठी सातारकरांना मदत मिळणार असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यापूर्वी रखरखत्या उन्हाच्या ज्वाळा सातारकरांना अंगावर झेलाव्या लागत होत्या; मात्र या ‘ग्रीन सिटी’मुळे शहराचे तापमानही कमी राहणार आहे. शिवाय हवेत गारवा आणि शहराच्या सुंदरतेतही आणखीनच भर पडणार आहे. चिंच, वड, जांभूळ, कडूलिंब आदी झाडे लावण्यात येणार आहेत. हे काम ठेकेदाराकडून पूर्ण करण्यात येणार असून, झाडांची देखभालही ठेकेदारच करणार आहेत. त्यामुळे झाडांच्या सुरक्षिततेचा प्रश्न साहजिकच मिटला आहे.
शहरातील
बागांही फुलणार !
या ‘ग्रीन सिटी’च्या माध्यमातून शहरातील रस्त्यावर आपल्याला झाडे पाहायला मिळणारच आहेत. या शिवाय ओस पडलेल्या बागांनाही आता नवसंजीवनी मिळणार आहे. गेंडामाळ बाग, सदर बझारमधील आयुर्वेदिक बाग, गोडोली तलाव, सुमित्राराजे उद्यान, महादरे तलाव, हुतात्मा गार्डन, सांबारवाडी, पॉवर हाउस, जकातवाडी जलशुद्धीकरण केंद्र तसेच सोनगाव कचरा डेपोमध्येही २ हजार २७८ झाडे लावण्यात येणार आहेत.
साताऱ्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या ‘ग्रीन सिटी’ प्रोजेक्टमुळे साताऱ्याच्या लौकिकात आणखीनच भर पडणार आहे. येत्या काही दिवसांतच शहरात सर्वत्र झाडे लावण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
- अभिजित बापट, मुख्याधिकारी, सातारा पालिका