साताऱ्यात ४९९ बांधकामे बेकायदा
By Admin | Updated: November 6, 2014 22:58 IST2014-11-06T21:51:19+5:302014-11-06T22:58:44+5:30
सुशांत मोरे : योग्य कार्यवाही न झाल्यास उद्यापासून बेमुदत उपोषण

साताऱ्यात ४९९ बांधकामे बेकायदा
सातारा : सातारा शहरात ४९९ अनधिकृत बांधकामे आहेत. बेकायदा बांधकामे करणाऱ्यांमध्ये नगरसेवकही आघाडीवर आहेत. शहरातील सर्व बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करावीत, अन्यथा दि. १० पासून बेमुदत उपोषण करण्यात येईल,’ असा इशारा दिशा विकास मंचचे कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी दिला आहे.
सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत मोरे म्हणाले, ‘सातारा शहरातील अनधिकृत बांधकामांसंदर्भातील माहितीच्या अधिकारात २००९ पासून वेळोवेळी माहिती घेतली आहे. मात्र, पालिका प्रशासन नोटिसा बजावण्यापलीकडे काहीही कार्यवाही करत नाही. ज्यांना नोटिसा बजावल्या आहेत, अशांना रकमेची नोटीस बजावून प्रशासन त्यांचे कर्तव्य पार पाडत आहे.
पालिका हद्दीत तळघर, वाहनतळाच्या जागेतील अतिक्रमण, गोदामच्या जागेतील अतिक्रमणे, शहर विकास आराखड्यानुसार रस्ता रुंदीकरणातील अडथळे, रॅम्प, कट्टे तत्काळ काढावीत. यामध्ये विविध धर्मीयांच्या प्रार्थना मंदिरांचाही समावेश आहे. शहरातील रुग्णालयांच्या इमारतीत वाहनतळाचा वापर व्यावसायासाठी केला जात आहे. त्यांच्यावर कारवाई करावी. पालिकेच्या मंगलकार्यालयाचाही समावेश आहे. त्यामुळे अशा मंगलकार्यालयावरही कारवाई करावी. शहर विकासातील वर्ग भागनिरीक्षक, अतिक्रमण प्रमुखांच्या शिक्षणाचा दर्जा तपासून त्यांच्या नियुक्त्या कराव्यात. शिक्षित व ज्ञानी व्यक्तीला भागनिरीक्षकांची नेमणूक द्यावी. शासकीय, निमशासकीय जागेवरील अतिक्रमणे, रस्ता बाधित अतिक्रमणे, खोकी, टपऱ्या तत्काळ काढावीत.’
‘राजथप, खणआळी, कर्मवीर पथ, राधिका रस्ता आणि गणपतराव तपासे मार्ग या रस्त्यांच्या मूळ नियोजन आराखड्यात रुंदी व सध्याची रुंदी यामध्ये तफावत आहे. अतिक्रमणे काढण्याची गरज आहे’ अशीही मागणी मोरे यांनी केली. (प्रतिनिधी)
शहरात बांधकाम व्यवसाय करताना आम्ही पालिकेचे परवाने घेऊनच बांधकामे केली आहेत. कुठलेही गैर काम मी केलेले नाही. गुरुवार पेठेतील शकुनी गणेश मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा, ही पेठेतील नागरिकांची मागणी होती. लोकांच्या इच्छेनुसार या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. कुणी तरी पुढे झाले तरच ते शक्य होते. त्यामुळे मी त्यात पुढाकार घेतला इतकंच.
- अशोक मोने, नगरसेवक
फुटके तळे हे पालिकेच्या मालकीचे आहे. तळ्यात मंदिर बांधण्याआधी हे तळे अस्वच्छ झाल्याने नागरिकांचे आरोग्य वेळोवेळी धोक्यात येत होते. पण, फुटका तलाव गणेश ट्रस्टने लिज पद्धतीने पालिकेकडून तळे घेतले. या तळ्यात जे मंदिर बांधले आहे, त्याचे भुईभाडे पालिकेला रीतसर भरले जाते. आजच्या घडीला संपूर्ण जगात या मंदिराबाबत चर्चा आहे. अनेक ठिकाणचे पर्यटक कास, सज्जनगडला जसे येतात, तसेच हे मंदिर पाहण्यासाठी उत्सुकतेने येतात.
- रवींद्र पवार, नगरसेवक