साता-यात कंटेनर अपघाताला गंभीर वळण
By Admin | Updated: February 11, 2016 14:35 IST2016-02-11T10:04:39+5:302016-02-11T14:35:22+5:30
पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करणा-या तरूणांना कंटेनरची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात दोन तरूण ठार तर दोघेजण जखमी झाले आहेत.

साता-यात कंटेनर अपघाताला गंभीर वळण
>ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. ११ - पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करणा-या तरूणांना कंटेनरची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात दोन तरूण ठार तर दोघेजण जखमी झाले. मात्र या अपघाताला आता गंभीर वळण मिळाले आहे. अपघातानंतर बराच वेळ पोलिस न आल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी पोलीस गाडीवर दगडफेक केल्यानंतर फौजदाराने जमावार पिस्तुल रोखल्याने परिस्थिती आणखीनच चिघळली.
साता-यातील कोरेगाव तालुक्यातील देऊर रेल्वे गेटजवळ गुरूवारी सकाळी धावण्याचा सराव करणा-या चार तरूणांना कंटेनरची धडक बसल्याने दोन जणांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. पोलीस भरतीसाठी चार युवक पहाटेपासून सातारा- लोणंद रोडवर धावण्याचा सराव करत होते. मात्र देऊर रेल्वे गेटजवळ त्यांना कंटनेरची जोरदार धडक बसली. अपघातात जबर जखमी झालेल्यांपैकी दोघांचा मृत्यू झाला तर इतर दोन जखमींवर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने गावावर शोककळा पसरली असून घटना घडून गेल्यानंतर ब-याच उशीरा आलेल्या पोलिस गाडीवर संतप्त ग्रामस्थांनी दगडफेक केली. त्यांना रोखण्यासाठी फौजदाराने जमावार पिस्तुल रोखली. तरूणांच्या मृत्यमुळे आधीच संतापलेला जमाव या घटनेमुळे आणखीनच भडकला आणि या फौजदारावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शेकडो ग्रामस्थांनी मोर्चा काढला. ग्रामस्थांनी दोन्ही तरूणांच्या मृतदेहांसह शववाहिका ग्रामपंचायत कार्यालयासमोरच लावल्याने तणावात आणखी भर पडली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांसह मोठा फौजफाटा घटनास्थळी हजर झाला. अखेर त्या फौजदारावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन मिळाल्यानंतरच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.