सरपंच सहा महिन्यांच्या वैद्यकीय रजेवर!

By Admin | Updated: June 9, 2015 00:11 IST2015-06-08T21:45:01+5:302015-06-09T00:11:50+5:30

मायणी ग्रामपंचायत : अडीच वर्षांत तिसरी वेळ ; प्रभारी पद्भार स्वीकारण्यास उपसरपंचाचा नकार

Sarpanch on six-month medical leave! | सरपंच सहा महिन्यांच्या वैद्यकीय रजेवर!

सरपंच सहा महिन्यांच्या वैद्यकीय रजेवर!

मायणी : येथील सरपंच महादेव यलमर अडीच वर्षांच्या कार्यकाळात तिसऱ्यांदा सहा महिन्यांच्या वैद्यकीय रजेवर गेले आहेत. तर उपसरपंच प्रकाश कणसे यांनी प्रभारी सरपंचपद स्वीकारण्यास नकार दिला आहे. यामुळे सत्ताधारी गटातर्फे सरपंच निवडीच्या हालचालीला ग्रामपंचायत सदस्य हिंमत देशमुख यांनी आक्रमक होऊन विरोध दर्शविलेला आहे.
याबाबत माहिती अशी की, आॅक्टोबर २०१२ मध्ये मायणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर महादेव यलमर यांनी सरपंचपदाचा कार्यभार स्वीकारला होता; पण प्रकृतीच्या कारणावरून ते सहा महिन्यांच्या वैद्यकीय रजेवर गेले होते. रजेचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा ही रजा सहा महिन्यांसाठी वाढवून घेतली.
त्यांच्या सहा-सहा महिन्यांच्या वैद्यकीय रजेचा कार्यकाळ १० मे रोजी संपला. त्यानंरही ते ग्रामपंचायत कार्यालयात हजर झाले नाहीत. त्यानंतर २९ मे पासून त्यांनी पुन्हा वैद्यकीय रजेसाठी गटविकास अधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. त्यामुळे अडीच वर्षांच्या कार्यकाळात तिसऱ्यांदा ते सहा महिन्यांच्या रजेवर गेले आहेत.
दरम्यान, उपसरपंच प्रकाश कणसे यांनी एक वर्षे प्रभारी सरपंचपद स्वीकारले होते; पण मे महिन्यामध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर कौटुंबिक जबाबदारी वाढल्याचे कारण सांगून त्यांनी प्रभारी सरपंचपदाची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आहे.
सत्ताधारी गटाने बहुमताच्या जोरावर ग्रामपंचायतीमधील एका सदस्याला सरपंचपद देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पण ग्रामपंचायत मुंबई १९५८ च्या नियमानुसार सरपंच रजेच्या काळासाठी प्रभारी सरपंच निवडण्याचा अधिकार ग्रामपंचायतीस नाही. त्यामुळे असा ठराव ग्रामपंचायतीतील सत्ताधारी मंजूर करत असतील तर तो बेकायदशीर ठरवावा, असा अर्ज विरोधी गटनेते हिंमत देशमुख यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केला आहे. यामुळे मायणी ग्रामपंचायतीतील या राजकीय घडामोडीमुळे विकासकामांना खिळ बसत असल्याचे दिसत आहे.
तांत्रिक अडचण असली तरी गावाच्या विकासही महत्वाचा असल्याने प्रशासकीय यंत्रणा व ग्रामस्थांनी एकत्र बसून काहीतरी तोडगा काढावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे. (वार्ताहर)


हार्निया व मूतखड्याचा त्रास असल्यामुळे मी वैद्यकीय रजा घेतलेली आहे. माझी प्रकृती मला साथ देत नाही. त्यामुळे मी वैद्यकीय रजेवर गेला आहे. माझ्यावर कोणाचेही दडपण नाही.
- महादेव यलमर
सरपंच, ग्रामपंचायत मायणी

सरपंचांनी कोणाच्या दबावाखाली न येता काम करावे, त्यांनी कोणाच्या दबावातून वारंवार रजेवर जाऊ नये. त्यांना विकासकामासाठी आम्ही सदैव पाठिंबा देऊ.
- हिंमत देशमुख
विरोधी गटनेते, मायणी.

माझ्या वडिलांचे निधन झाल्यामुळे माझ्यावर कौटुंबिक जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे मी प्रभारी सरपंचपदाची जबाबदारी पार पाडू शकत नाही. ही जबाबदारी इतर कोणाकडेही सोपविण्यास माझी हरकत नाही.
- प्रकाश कणसे
उपसरपंच, मायणी.

Web Title: Sarpanch on six-month medical leave!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.