सरपंच निवडीचे ‘हाय होल्टेज टेन्शन’!
By Admin | Updated: August 9, 2015 00:48 IST2015-08-09T00:25:04+5:302015-08-09T00:48:45+5:30
गावागावांत तणाव : काठावरचे बहुमत; उमेदवार फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत

सरपंच निवडीचे ‘हाय होल्टेज टेन्शन’!
सातारा : जिल्ह्यातील काठावरचे बहुमत असणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये सध्या ‘हाय होल्टेज टेन्शनचा थ्रिल’ अनुभवायला मिळत आहे. गावगुंडीत तरबेज असणारी मंडळी सरपंचपदावर कुणाची निवड करायची?, यासाठी गोपनीय बैठका घेऊ लागले आहेत. रात्रीच्या वेळी लोकांच्या घराच्या कड्या वाजण्याचे प्रमाण कमी झाले असून, गावापासून दूर फार्म हाउसमध्ये बाजी पालटण्याचे आडाखे बांधले जाऊ लागले आहेत.
५४७ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडल्यानंतर गावागावांत तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. निवडणूक म्हटले की, हार-जीत ठरलेली असते; पण अनेक ठिकाणी पराभवाला सामोरे जावे लागलेले उमेदवार नेत्यांसोबत आत्मचिंतन करू लागली आहे. वॉर्डात कुठल्या भागात मते कमी पडली, याचे गणित सोडवण्यात सध्या त्यांचा दिवस जात असल्याचे चित्र सर्वत्र आहे. अनेक ठिकाणी गावातील मातब्बर मंडळी पराभव जिव्हारी लागल्याने टेन्शनमध्ये आहेत.
प्रत्येक गावामध्ये ‘सरपंच कोण होणार?’ याचीच जोरदार चर्चा सुरू आहे. गावांमध्ये गटा-गटाने उभी असलेले स्थानिक लोक चर्चा करताना अंदाज व्यक्त करत आहेत. याबाबत काही ठिकाणी पैजाही लागू लागल्या आहेत. सरपंचपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? आणि कोण उपसरपंच होणार?, याबाबतच्या चर्चांना जोरदार ऊत आलेला आहे.
जिल्ह्यातील ७११ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. यापैकी जवळपास ७० टक्के ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये या पक्षाला निर्विवाद सत्ता मिळाली असली तरी काही ग्रामपंचायतींमध्ये काठावरचे बहुमत असल्याने तणावाचे वातावरण आहे. काँगे्रस, राष्ट्रवादी अंतर्गत असणाऱ्या गटांमध्ये सध्या उमेदवारांच्या ओढा-ओढीचे राजकारण सुरू झाले आहे. ७११ ग्रामपंचायतींपैकी १६१ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. ३ ग्रामपंचायतींमध्ये उमेदवारच मिळाले नाहीत. तर ५४७ ग्रामपंचायतींसाठी नुकतेच रणकंदन झाले.
अनेक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामपंचायत सदस्यांच्या जागा बिनविरोध करण्यात स्थानिक नेतमंडळींना यश आले होते. आता या बिनविरोध सदस्यांना फोडण्याचे राजकारणही काही ठिकाणी खेळले जात आहे.
ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत पक्षीय राजकारण नव्हते, एकाच पक्षाचे दोन गट एकमेकांविरोधात लढल्याचे चित्र जागोजागी पाहायला मिळाले. त्यामुळे पॅनेल जरी केले असले तरी ते रजिस्टर नसल्याने प्रत्येक उमेदवार वेगळ्या चिन्हावर निवडून आलेला आहे. उमेदवार निवडून आणण्यामध्ये नेत्यांचा कस लागला तर काही ठिकाणी उमेदवाराच्या वैयक्तिक लोक संपर्काच्या आधारावर त्याने विजय मिळविला आहे. त्यामुळे आमिष दाखवून निवडून
आलेले उमेदवार फोडण्याच्या हालचाली जोरदार रंगू लागल्या आहेत.
काही गावांमध्ये अगदी काठावर बहुमत असल्याने नेतेमंडळींचा कस लागला आहे. बिनविरोध उमेदवारांशी गाठीभेटी घेऊन सत्ता मिळविण्याचे राजकारण खेळले जाऊ लागले आहेत. उमेदवार बिनविरोध करण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारे नेतेमंडळी रात्री जागून काढत असून, काही ठिकाणी हे उमेदवार सहलीवर गेल्याचे चित्र आहे. त्यांच्याशी कोणी संपर्क साधू नये, यासाठी
गावोगावी विशेष काळजी घेतलेली दिसत आहे. (प्रतिनिधी)
सांगा बिनविरोध उमेदवार कुणाचा?
अनेक गावांतील काही वॉर्डात उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे हे बिनविरोध उमेदवारच सरपंच निवडीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. ते नेमके कुठल्या गटात जाणार यावरच स्थानिक सत्ताकारण आकारास येणार आहे.
पराभुतांच्या घरासमोर गुलाल ओतला!
काही गावांत तर विजयी झालेल्या उमेदवारांच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी पराभूत झालेल्या उमेदवारांच्या घरासमोर गुलाल ओतला. फटाकेही वाजवले, त्यामुळे तणावात आणखी भर पडली आहे.