सरपंच, ग्रामसेवकांना ग्रामसभेत मारहाण
By Admin | Updated: February 6, 2015 00:43 IST2015-02-05T23:45:41+5:302015-02-06T00:43:36+5:30
गोटेतील घटना : तहकूब सभेत नवीन विषय घेण्यावरून वाद

सरपंच, ग्रामसेवकांना ग्रामसभेत मारहाण
कऱ्हाड : गोटे, ता. कऱ्हाड येथे आयोजित ग्रामसभेत सरपंच व ग्रामसेवकांना मारहाण करण्यात आली. गुरुवारी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिसांत मुनीर रज्जाक सय्यद (रा. गोटे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामसेवक जगन्नाथ गंगाराम साळुंखे (रा. वडगाव हवेली, ता. कऱ्हाड) व सरपंच रशिद इसाक आगा (रा. गोटे) हे मारहाणीत जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोटे येथे प्रजासत्ताकदिनी २६ जानेवारी रोजी ग्रामसभा घेण्यात आली होती. त्यावेळी कोरमअभावी सभा तहकूब करण्यात आली. तसेच ही तहकूब सभा पुढे ५ जानेवारी रोजी घेण्याचे ठरले. त्यानुसार आज (गुरुवारी) ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा आयोजित करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच रशिद आगा होते. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास सभेला सुरुवात झाली. त्यावेळी ग्रामसेवक जगन्नाथ साळुंखे यांनी नियमाप्रमाणे तहकूब सभेतील विषयांव्यतिरिक्त इतर विषय या सभेत घेता येणार नसल्याचे सांगून प्रोसिडिंग वाचण्यास सुरुवात केली. त्यावेळी मुनीर सय्यद जागेवरच उठून उभा राहिला. ‘माझा विषय पहिला घेण्यात यावा,’ अशी त्याने मागणी केली. मात्र, ग्रामसेवक साळुंखे यांनी तसे करता येणार नसल्याचे सांगितले. त्यावेळी मुनीर सय्यद याने ग्रामसेवक साळुंखे यांच्याकडे धाव घेत त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. टेबलवरील कागदपत्रेही त्याने विस्कटून दिली. या धक्काबुक्कीत खुर्चीवरून खाली कोसळून ग्रामसेवक साळुंखे जखमी झाले. हा प्रकार सुरू असताना सरपंच रशिद आगा भांडणे सोडविण्यासाठी गेले. त्यावेळी मुनीर सय्यद याने त्यांनाही धक्काबुक्की केली. त्यामध्ये सरपंच आगा यांच्या पायाला जखम झाली. याबाबत ग्रामसेवक जगन्नाथ साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुनीर सय्यद याच्यावर कऱ्हाड शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
शुक्रवारी धरणे आंदोलन
गोटे गावच्या ग्रामसभेत घडलेली घटना निषेधार्ह असून, दोषींना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी कऱ्हाड तालुका ग्रामसेवक युनियनच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी शुक्रवारी पंचायत समितीसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही युनियनने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.