सर्जेराव खुटेकर यांची कामगिरी अतुलनीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:43 IST2021-08-24T04:43:40+5:302021-08-24T04:43:40+5:30
सातारा : ‘स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्यांच्या प्राणांचे रक्षण करणे म्हणजे अनन्यसाधारण शौर्यच. अतिवृष्टीच्या काळात दगडमाती आणि पाण्याच्या ...

सर्जेराव खुटेकर यांची कामगिरी अतुलनीय
सातारा : ‘स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्यांच्या प्राणांचे रक्षण करणे म्हणजे अनन्यसाधारण शौर्यच. अतिवृष्टीच्या काळात दगडमाती आणि पाण्याच्या प्रवाहात ओढ्यातून वाहून जाणाऱ्या चारजणांचे प्राण वाचवून जावलीतील सर्जेराव खुटेकर यांनी अलौकिक आणि अतुलनीय कामगिरी करून माणुसकीचे अनोखे दर्शन घडवले आहे,’ असे गौरवोद्गार आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले.
जावली तालुक्यातील मुकवली गावचे सर्जेराव जानू खुटेकर हे गावच्या ग्रामपंचायतीचे शिपाई आहेत. ते दररोज केळघर येथील ग्रामपंचायत कार्यालयात ये-जा करतात. दरम्यान, जावलीमध्ये दि. २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठी हानी झाली होती. ठिकठिकाणी रस्ते पूल वाहून गेल्याने खुटेकर हे त्या दिवशी सायंकाळी ५.३० च्या सुमारास पायी चालत मुकवलीकडे निघाले होते. केळघर घाटात आल्यानंतर थोरला ओढा येथे दगडमाती आणि पाण्याच्या प्रवाहात एक कार वाहून निघाली होती. खुटेकर यांनी जीवाची पर्वा न करता त्या कारच्या मागे धावत जाऊन कारची मागची काच फोडली आणि कारमधील दोन जणांना सुखरूप बाहेर काढले. याशिवाय या ओढ्याच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या रेंगडी येथील दोनजणांचे प्राणही त्यांनी वाचवले.
चार नागरिकांच्या प्राणांचे रक्षण करणाऱ्या खुटेकर यांच्या अतुलनीय शौर्य आणि माणुसकीचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी कौतुक करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. आपत्कालीन परिस्थिती आणि संकटकाळात दुसऱ्यांच्या प्राणांचे रक्षण करणे, ही एक मोठी जबाबदारी आहे आणि या जबाबदारीची जाणीव खुटेकर यांच्यासारख्या लोकांमुळे समाजाला कायम होत राहील. खुटेकर यांचे शौर्य युवकांना नेहमीच प्रेरणा देत राहील, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यावेळी म्हणाले.
फोटो ओळ- सर्जेराव खुटेकर यांचा सत्कार करताना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले
फोटो नेम : २१ शिवेंद्र