साप-पिंपरी फाटा चौक अपघाताचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:41 IST2021-03-09T04:41:52+5:302021-03-09T04:41:52+5:30

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर-औंध रस्त्यावरील साप-पिंपरी फाटा येथील चौक अपघाताचे केंद्र बनले आहे. रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण झाल्यापासून ...

Sap-Pimpri Fata Chowk Accident Center | साप-पिंपरी फाटा चौक अपघाताचे केंद्र

साप-पिंपरी फाटा चौक अपघाताचे केंद्र

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर-औंध रस्त्यावरील साप-पिंपरी फाटा येथील चौक अपघाताचे केंद्र बनले आहे. रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण झाल्यापासून सुसाट धावणाऱ्या वाहनांमुळे या ठिकाणी अनेक अपघात होऊन वाहनधारक जायबंदी झाले आहेत.

रहिमतपूर-औंध रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाले आहे. तेव्हापासून या मार्गावरून ये-जा करणारी वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. सध्या ऊसतोडणीचा हंगाम जोमात सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर उसाने भरलेल्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. रहिमतपूर बसस्थानकापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर साप व पिंपरी फाटा आहे. या चौकामध्ये रहिमतपूरकडून औंधकडे जाणारी वाहने, औंधकडून रहिमतपूरकडे येणारी वाहने तसेच साप व पिंपरीमधून रहिमतपूर व औंधकडे जाणारी वाहने अशी वाहनांची वर्दळ दररोज असते. गेल्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी अनेक दुचाकी व चारचाकी वाहनांचे विचित्र पद्धतीने अपघात झाले आहेत. अनेक वाहनधारक यामध्ये गंभीर जखमी झाले असून, वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रामुख्याने इकडे-तिकडे न पाहता बेशिस्तपणे चौकामध्ये अचानक येणाऱ्या वाहनांमुळे अपघात वाढू लागले आहेत.

पवारवाडी गावाच्या हद्दीत गेल्या दहा ते बारा दिवसांपूर्वी ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकी व ट्रॅक्टरच्या झालेल्या अपघातात दुचाकीचालक जखमी झाला होता. साप व पिंपरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दर्शनी भागात गावांच्या नावांचे सूचनाफलक लावलेले नसल्यामुळे रहिमतपूर व औंधकडून येणाऱ्या वाहनचालकांना याठिकाणी गावाकडे जाणारे रस्ते असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे वाहने वेगाने ये-जा करतात. त्यामुळे या ठिकाणी सूचना फलक लावल्यास वाहनचालक योग्य ती वेगमर्यादा ठेवूनच गाडी चालवेल. त्यामुळे सूचनाफलक तातडीने लावावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

(चोैकट)

बेफाम गाडीचालकावर कारवाई करा

साप-पिंपरी फाट्यासह रहिमतपूर-पिंपरी फाटा या दरम्यानच्या रस्त्यावरही बेफाम वाहनचालकांमुळे मोठी वाहने पलटी होत आहेत. सुमारे दीड महिन्यापूर्वी जनावरांचा चारा घेऊन निघालेला टेम्पो दुचाकी आडवी आल्याने कॅनॉलजवळ पलटी झाला होता. या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. असे विदारक अपघात टाळण्यासाठी बेफाम गाडी चालवणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

०८रहिमतपूर

फोटो : रहिमतपूर-औंध रस्त्यावरील साप-पिंपरी फाटा हा चौक अपघातांचा केंद्रबिंदू बनू पाहत आहे. (छाया : जयदीप जाधव)

Web Title: Sap-Pimpri Fata Chowk Accident Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.