वाहन गेले की थरथरतो ‘सांगवी पूल’

By Admin | Updated: December 29, 2014 23:41 IST2014-12-29T20:50:41+5:302014-12-29T23:41:16+5:30

निरा नदी : फलटणकरांना प्रतीक्षा नव्याची...

'Sangvi Pool' shakes the vehicle | वाहन गेले की थरथरतो ‘सांगवी पूल’

वाहन गेले की थरथरतो ‘सांगवी पूल’

फलटण : फलटण-बारामती रस्त्यावरील सांगवी येथील निरा नदीवरील वाहतुकीच्या पुलाची मोठी दुर्दशा झाली आहे. या पुलावरील वर्दळ पाहता हा पुल साक्षात मृत्यूचा सापळा बनला आहे. या पुलाशेजारी नवीन पुलाचे कामही रखडल्याने प्रवाशांच्यात भितीचे वातावरण आहे.
फलटण ते बारामती हे २५ किलामिटर अंतर असून सध्या शिरवळ फलटण बारामती असा चौपदरीकरणाचे काम मंजुर करण्यात आले आहे. त्यामुळे पूर्ण रस्ता खाजगी ठेकेदाराकडे वर्ग करण्यात आला आहे. फलटण ते बारामती रस्त्यांवर अनेक ठिकाणी त्यांनी रस्त्याची, पुलांची कामे सुरू करून अर्धवट स्थितीत ठेवली आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी वळणे, खड्डे अपघातांना निमंत्रण मिळत आहे.
फलटण ते बारामती रस्त्यावर सतत अपघातांची मालिका सुरू असून त्यामध्ये शेकडो जणांचा जीव रस्त्याच्या दुरावस्थेमुळे गेला आहे. अनेकांना अपघातामुळे अपंगत्वही आले आहे. अशीच परिस्थिती निरा नदीवर असलेल्या जुन्या व नव्या पुलांची झाली आहे. निरा नदीवर सांगवी येथे जुना पुल आहे. या पुलाला बाजुने कठडे व या कठड्यांना अपघात होवू नये म्हणून साखळदंड आहेत. या पुलावरून दररोज लहान, मोठे, अवजड अशी हजारो वाहनांची दिवसरात्र वर्दळ चालु असते. या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्यांचे साम्राज्य पसरले आहेच पण पुलावरील कट्टे तुटलेल्या स्थितीत आहेत.
पुलाला कठडे नसल्याने जर अपघात होवून कोणी नदीत पडले तर त्याला वाचवणे अवघड होत आहे. रात्रीच्या वेळेस तर तुटलेल्या कठड्यामुळे हा पुल भयानक परिस्थितीत दिसतो. दहा बारा वर्षांपूर्वी एक वऱ्हाडाचा अख्खा ट्रक नदीत पडून अनेकांचा मृत्यू झाला होता. आजही या पुलावरून जाताना अनेकांना त्या अपघाताची आठवण होते. मात्र शासकीय यंत्रणा किंवा चौपदरीकरणाचे काम हाती घेतलेल्या ठेकेदारांनी या पुलाकडे तसेच रस्त्याच्या दुरावस्थेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.
फलटण बारामती रस्ता चौपदरीकरणासाठी ठेकेदाराला हस्तांतरीत करण्यात आल्याने या रस्त्याच्या डागडुजीकडे आम्हाला लक्ष देता येत नसल्याचे शासकीय यंत्रणेचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)

वाहनांच्या वर्दळीने थरथरतो रस्ता
निरा नदीवरील या पुलाशेजारी नवीन पुलाचे काम चौपदरीकरणांतर्गत हाती घेण्यात आले. पण अर्धवट स्थितीत हा पूल सोडून दिल्याने या पुलाचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे जुन्या पुलावरूनच पूर्ण वाहतुक सुरू आहे.
पुलावरील खड्डे व तुटलेले कट्टे यामुळे मोठ्या वाहनांच्या येण्या जाण्यामुळे पूल थरथरताना दिसतो.
एखाद्या दिवशी धोकादायक स्थितीत असलेला पूल तुटल्यास याला कोण जबाबदार राहणार असा सवाल वाहनधारक उपस्थित करत आहेत.

Web Title: 'Sangvi Pool' shakes the vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.