सांगलीवरील पाणी संकट तात्पुरते टळले
By Admin | Updated: February 29, 2016 01:01 IST2016-02-28T23:59:49+5:302016-02-29T01:01:17+5:30
महापालिकेला दिलासा : महिनाभर पुरेल इतका पाणीसाठा; कृष्णा नदीत दोन फूट पाणी आले

सांगलीवरील पाणी संकट तात्पुरते टळले
सांगली : तब्बल तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सांगलीच्या कृष्णा नदीत कोयनेतून सोडलेले पाणी पोहोचले. दिवसभरात नदीची पाणीपातळी दोन फुटापर्यंत गेली होती. सांगलीत पाणी पोहोचल्याने शहरावरील पाणी टंचाईचे संकट तात्पुरते टळले आहे. शिवाय पाणी कपातीचा निर्णयही महापालिका प्रशासनाने लांबणीवर टाकला आहे.
फेब्रुवारी महिन्यातच सांगलीतील कृष्णा नदी कोरडी पडली होती. नदीपात्रातील पाणीसाठा कमी झाल्याने सांगली व कुपवाड या दोन शहरांवर पाणी संकट दिवसेंदिवस गडद होत चालले होते. महापालिकेने पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून कोयनेतून पाणी सोडण्याची विनंती केली होती. कोयनेतून दोन हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. पण गेली तीन दिवस हे पाणी सांगलीपर्यंत पोहोचले नव्हते. त्यामुळे महापालिकेची चिंता वाढली होती. अखेर रविवारी कोयनेतून सोडलेले पाणी सांगलीच्या बंधाऱ्यापर्यंत पोहोचले. दिवसभरात नदीपात्रात दोन फूट पाणी होते. आणखी दोन ते तीन दिवसांत पाणीसाठा वाढणार आहे. तेव्हा सांगली बंधाऱ्यावरून पाणी वाहून जाईल. त्यामुळे सध्या नदीपात्रात असलेले दूषित पाणी वाहते होईल, असा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आहे.
सांगलीत कोयनेचे पाणी आल्याने महापालिकेने सुटकेचा नि:श्वास टाकला. आणखी महिनाभर तरी पाण्याची कमतरता भासणार नाही. महापालिकेने पाटबंधारे विभागाशी ताळमेळ साधला असून, भविष्यातील पाण्याचेही नियोजन केले आहे. सध्या तरी सांगली व कुपवाड या दोन शहरावरील पाणी टंचाईचे संकट तुर्तास टळले आहे.
दरम्यान, नदीपात्रात पाणी पातळी कमी झाल्यानंतर महापालिकेने जॅकवेलच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतली होती. दोन दिवसांपासून जॅकवेल व त्याच्या अवतीभोवतीचा परिसर स्वच्छ करण्यात आला. त्यामुळे सांगलीच्या नागरिकांना स्वच्छ पाणी मिळणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शीतलनाथ उपाध्ये यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पाईपलाईनचे काम सुरू : सांडपाण्यावर उपाय
सांगलीत जनावरांच्या बाजारातून नदीकडेने जाणारी मोठी गटार फुटल्याने सांडपाणी कृष्णा नदीत मिसळत होते. त्यावर उपाय म्हणून महापालिकेने बंद पाईपलाईनमधून सांडपाणी नेण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्यानुसार पालिकेने पाईपलाईनचे काम हाती घेतले आहे. पुलापलीकडे शेरीनाल्याची पाईपलाईन सांगली बंधाऱ्यापर्यंत नेण्यात येणार आहे. सुमारे अडीचशे मीटर पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यास बंधाऱ्यात सांडपाणी मिसळणार नाही.