मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशी संभाजीराजेंची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:36 IST2021-05-22T04:36:22+5:302021-05-22T04:36:22+5:30
सातारा : मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. खासदार संभाजीराजे येत्या २७ मे रोजी आपली भूमिका स्पष्ट ...

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशी संभाजीराजेंची चर्चा
सातारा : मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. खासदार संभाजीराजे येत्या २७ मे रोजी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत, या पार्श्वभूमीवर शुक्रवारी त्यांनी साताऱ्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशी भेट घेऊन चर्चा केली.
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण रद्द झाल्याचा आरोप भाजप करीत आहे, तर सरकारने पूर्ण प्रयत्न केले तरीही सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केले. आता केंद्र सरकारनेच आरक्षणाबाबतचा निर्णय जाहीर करावा, अशी मागणी महाविकास आघाडी सरकारने केलेली आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा हा राजकीय ठरत असल्याने खासदार संभाजीराजे यांनी मात्र स्वतंत्र भूमिका घेतल्याचे पाहायला मिळते. पक्षीय चौकटी झुगारून त्यांनी आता हालचाली सुरू केलेल्या आहेत. मराठा समाज हा पिचलेला आहे. मोजक्या लोकांकडे संपत्ती, साम्राज्य असले तरीदेखील बहुसंख्येने लोक मोलमजुरी करून जगत आहेत, त्यांच्यापुढे भविष्याचा प्रश्न उभा आहे. तसेच मुलांना शिक्षण कसे द्यायचे? त्यांना नोकऱ्या लागतील का? असे अनेक प्रश्न त्यांना सतावत आहे. यापूर्वीची आरक्षणे दिली आहेत, त्यांचा फेर सर्व्हे करावा, आर्थिक निकष लावावा किंवा मराठ्यांना ईबीसी सवलतीप्रमाणे सरसकट आरक्षणाचा लाभ द्यावा, अशा पद्धतीच्या मागण्या पुढे येत आहेत.
या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यातील समन्वयकांशी संवाद सुरू ठेवलेला आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आगामी कोणती भूमिका घ्यायची याबाबतचा निर्णय ते २७ मे रोजी जाहीर करणार आहेत. त्याआधी ते राज्यभर जाऊन मराठी क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशी अशी सविस्तर चर्चा करणार आहेत, तसेच त्यांची मतेदेखील जाणून घेणार आहेत.
यावेळी राज्य समन्वयक विवेकानंद बाबर, बंडू कदम, उमेश शिर्के, संदीप नवघणे यांच्याशी मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने पुढील भूमिकेबाबत संभाजीराजेंनी सविस्तर चर्चा केली.
आरक्षण वाढवून मिळण्यासाठीच प्रयत्न..
राज्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागास प्रवर्ग यांच्यामध्येच ५० टक्के आरक्षण विभागलेले आहे, तर भटक्या-विमुक्तांना राज्य सरकारने आरक्षणाची मर्यादा वाढवून दोन टक्के आरक्षण दिलेले आहे. केंद्र सरकारने आरक्षणाची मर्यादा ७२ टक्क्यांवर करावी, अशी मागणी संभाजीराजे करणार असल्याची शक्यता कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
फोटो ओळ : सातारा येथे खासदार संभाजीराजे यांनी शुक्रवारी मराठा क्रांती मोर्चाच्या सातारा शहरातील समन्वयकांशी चर्चा केली.