समर्थ मंदिर बसथांबा अखेर हलविला!
By Admin | Updated: November 28, 2015 00:21 IST2015-11-27T22:59:38+5:302015-11-28T00:21:24+5:30
चौकाने घेतला श्वास : बोगद्याकडून येणारी वाहने आता गोविंदनगरी इमारतीजवळ थांबणार लोकमतचा प्रभाव

समर्थ मंदिर बसथांबा अखेर हलविला!
सातारा : कित्येक वर्षांपासून समर्थमंदिर परिसरात उभारत असलेल्या एसटीमुळे वाहतुकीची कोंडी होत होती. समर्थ मंदिराजवळचा हा थांबा हलविला असून, बोगद्याकडून शहरात येणाऱ्या एसटी बसेस गुरुवारपासून गोविंदनगरी इमारतीजवळ उभारण्यास प्रारंभ झाला आहे. यामुळे समर्थ मंदिर चौकाने मोकळा श्वास घेतला आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस येथील समर्थमंदिर चौकात अनेक वर्षांपासून उभ्या केल्या जात होत्या. रोज सकाळी नऊ ते अकरा व सायंकाळी पाच ते साडेसहा या वेळेत गाड्यांच्या फेऱ्या वाढलेल्या असतात. त्याचवेळी शाळा-महाविद्यालय भरणे किंवा सुटलेले असल्याने या चौकात वाहनांची वर्दळ असत. त्यामुळे अर्धा-अर्धा तास वाहतूक विस्कळीत होत होती. ही बाब ‘लोकमत’ने एसटी प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. याची दखल घेऊन एसटीने येथील थांबा गुरुवारपासून पुढे हलविला आहे.
बोगदा व कास परिसरातून शहरात येणाऱ्या गाड्या चौकातच तिरक्या लावल्या जात होत्या. पूर्वी या परिसरातील लोकसंख्या मर्यादित होती. त्यामुळे फारशी समस्या जाणवत नव्हती. या परिसरात लोकवसाहत वाढली आहे. तसेच घरटी दोन-दोन मोटारसायकल आल्याने चौकात वाहनांची वर्दळ वाढलेली आहे. सकाळी व सायंकाळी शाळा, महाविद्यालय सुटण्याच्या वेळेत वाहतुकीची कोंडी होत होती.
विभागीय वाहतूक शाखेने काही दिवसांपूर्वी या परिसराची पाहणी करून बोगद्याकडून येणाऱ्या गाड्या चौकात न थांबता गोविंदनगरी इमारतीजवळ उभ्या करण्याचा निर्णय घेतला. त्याला सातारा पोलिसांची वाहतूक शाखा व पालिकेने परवानगी दिल्याने या बसथांब्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार गुरुवारी दिवसभर एक कर्मचारी या ठिकाणी उभा केला होता. ही व्यक्ती सर्व गाड्यांच्या चालकांना चौकात उभ्या न करण्याच्या सूचना करत होती. (प्रतिनिधी)