सालपेत वृद्धेचा निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:12 IST2018-10-30T00:12:29+5:302018-10-30T00:12:33+5:30

लोणंद/आदर्की : पहाटे लघु-शंकेसाठी घरातून बाहेर पडलेल्या वृद्धेवर अज्ञाताने धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. संबंधित वृद्धेच्या ...

Salping murdered old man | सालपेत वृद्धेचा निर्घृण खून

सालपेत वृद्धेचा निर्घृण खून

लोणंद/आदर्की : पहाटे लघु-शंकेसाठी घरातून बाहेर पडलेल्या वृद्धेवर अज्ञाताने धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
संबंधित वृद्धेच्या अंगावरील दागिने लंपास झाले असल्याने चोरीच्या उद्देशाने खून झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ही खळबळजनक घटना फलटण तालुक्यातील सालपे येथे सोमवारी घडली. शांताबाई जयवंत खरात (वय ७०) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
लोणंद पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, शांताबाई खरात या सोमवारी पहाटे चारच्या सुमारास लघुशंकेसाठी घराच्या बाहेर गेल्या होत्या.
पंधरा मिनिटे होऊनही त्या घरात न आल्याने त्यांचे पती जयवंत खरात हे बाहेर गेले. तेव्हा त्यांना शांताबाई रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. जयवंत यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून मुलगा संतोष बाहेर आले असता त्यांना त्यांची आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यांना तातडीने उपचारासाठी लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र्रात आणले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या पाठीवर डाव्या बाजूला धारदार शस्त्राने दोन वार केले होते. तसेच त्यांच्या गळ्यातील पोत गायब होती. चोरीच्या उद्देशाने आलेल्या व्यक्तीने खून केला असावा, अशी शक्यता संतोष जयवंत खरात यांनी लोणंद पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादित दिली.
घटनेची माहिती मिळताच लोणंदचे सहायक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथकासही पाचारण करण्यात आले. मात्र श्वानही घराच्या आसपास घुटमळले. घटनास्थळी उपविभगीय पोलीस अधिकारी डॉ. अभिजित पाटील यांनी भेट दिली.
 

Web Title: Salping murdered old man