आरोग्य केंद्रात सलाईन बंद; ‘बाटली’ चालू !
By Admin | Updated: July 16, 2014 01:23 IST2014-07-16T01:18:11+5:302014-07-16T01:23:02+5:30
मद्यपींचा राबता : कुठरेत डॉक्टरअभावी रूग्णालय बंद, ग्रामस्थांची गैरसोय

आरोग्य केंद्रात सलाईन बंद; ‘बाटली’ चालू !
बाळासाहेब रोडे - सणबूर
पाटण तालुक्यतील कुठरे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पाच वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने बंद स्थितीत आहे़ उपकेंद्र कशामुळे बंद झाले, याचे कारण अद्याप ग्रामस्थांना कळालेच नाही. सुमारे २ हजार लोकसंख्या असलेल्या या गावांतर्गत सुपुगडेवाडी, लोकरेवाडी, बादेवाडी, वाझोली, मोरेवाडी, पवारवाडी, मोळावडेवाडी, पागेवाडी, कदमवाडी या गावांचा समावेश आहे़ मात्र, उपकेंद्र बंद असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे.
कुठरे हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने आसपासच्या गावातील लोकांना प्राथमिक उपचारासाठी प्राथमिक उपकेंद्र हे सोयीचे ठिकाण होते़ परंतु, पाच वर्षांपासून येथील उपकेंद्र बंद अवस्थेत असल्यामुळे लोकांची मोठया प्रमाणात गैरसोय होत आहे़ साथीचे रोग, विविध प्रकारच्या लसीकरण मोहीम यासाठी काळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी या ठिकाणी येवून तात्पुरत्या स्वरूपाचे उपचार करत होते़ परिसरातील व्यक्ती आजारी पडली तर तिला उपचारासाठी तळमावले अथवा धामणी येथील खाजगी दवाखान्यात जावे लागत आहे़
शासनाने उपकेंद्रासाठी मोठया प्रमाणात निधी खर्च करून सर्व सुविधा दिल्या मग डॉक्टर का येत नाहीत, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर उभा रहात आहे़ उपकेंद्र बंद असल्याने लोकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होतच आहे शिवाय दिवस वाया जात आहे़
उपकेंद्राच्या इमारतीमध्ये अद्ययावत साहीत्य असून दवाखाना बंद असल्याने साहित्य व औषधे धूळ खात पडली आहेत़ परिणामी गावातील तळीरामांनी इमारतीचा आडोसा आपला अड्डाच बनवला आहे़ त्यामुळे या ठिकाणी दारूच्या रिकाम्या व फुटलेल्या बाटल्या दिसत आहेत़ उपकेंद्र ‘असुन अडचण, नसून खोळंबा’ अशा परीस्थितीत आहे़ उपकेंद्र सुरू होण्यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार दाद मागितली; पण याबाबत सकारात्मक उत्तरे अजून मिळाली नाहीत़