खरेदी-विक्री संघाकडून जुन्या दराने रासायनिक खतांची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:38 IST2021-05-23T04:38:58+5:302021-05-23T04:38:58+5:30
पिंपोडे बुद्रुक : ‘इफको’ रासायनिक खत निर्मिती कारखाना व्यवस्थापनाने रासायनिक खतांच्या वाढीव किमतीत कपात केल्याचे जाहीर करताच खरेदी-विक्री संघाच्या ...

खरेदी-विक्री संघाकडून जुन्या दराने रासायनिक खतांची विक्री
पिंपोडे बुद्रुक : ‘इफको’ रासायनिक खत निर्मिती कारखाना व्यवस्थापनाने रासायनिक खतांच्या वाढीव किमतीत कपात केल्याचे जाहीर करताच खरेदी-विक्री संघाच्या सोनके शाखेतून जुन्या दराने खतांची विक्री सुरू केल्याने खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली.
रासायनिक खत निर्मिती कारखान्यांनी सर्वच खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ केल्यानंतर शेतकऱ्यांची बाजू लक्षात घेत कोरेगाव खरेदी-विक्री संघाने दराबाबत शासन निर्णय होईपर्यंत सुधारित दराने खतांची विक्री थांबवली होती. तसेच शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन खत निर्मिती कारखाना व्यवस्थापनाला शेतकऱ्यांची सद्यस्थिती कथन करत दर कपात करण्याबाबत विनंती केली होती. तथापि इफको रासायनिक खत निर्मिती कारखाना व्यवस्थापनाने खतांच्या दरात कपात केल्याचे कळविले आहे. त्यानंतर तालुक्यातील सोनके खरेदी-विक्री संघास प्राप्त झालेल्या नव्या दरातील खतांच्या विक्रीस सुरुवात केली. त्यामुळे खत खरेदीसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली. बाजारात उपलब्ध असलेल्या जास्त छापील किमतीच्या खतांची विक्रीही जुन्या दराने होणार असल्याची माहिती कोरेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन भागवतराव घाडगे, संचालक मनोहर बर्गे यांनी दिली आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कोरेगाव तालुका खरेदी-विक्री संघाने नेहमीच शेतकऱ्यांसाठी हितावह निर्णय घेतले आहेत. इतर खत उत्पादित कंपन्यांनी खतांच्या किमतीत कपात करावी यासाठी संघ प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांनी खते व बियाणे खरेदीसाठी संघाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन व्यवस्थापक राजेंद्र येवले, सुखदेव माने यांनी केले आहे.