खराडेमध्ये साकारतेय दहा बेडचे कोरोना विलगीकरण केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:38 IST2021-05-23T04:38:47+5:302021-05-23T04:38:47+5:30
मसूर : कऱ्हाड तालुक्यातील खराडे येथे कोरोनाच्या महामारीपासून गावातील ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून १० ...

खराडेमध्ये साकारतेय दहा बेडचे कोरोना विलगीकरण केंद्र
मसूर : कऱ्हाड तालुक्यातील खराडे येथे कोरोनाच्या महामारीपासून गावातील ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून १० बेडचे कोरोना विलगीकरण केंद्राचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्याचे लवकरच लोकार्पण होणार आहे.
याबाबत माहिती अशी की, खराडे येथे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अद्याप एकही रुग्ण नाही. ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी केलेली उपाययोजना याला कारणीभूत ठरली आहे. गावाने गावात कोरोनाचा एकही रुग्ण नाही म्हणून गप्प न बसता गावात येणारे सर्व रस्त्यावर नाकाबंदी केले. गावात येण्यास सर्वांना गावाबाहेरच रोखले मग तो कितीही जवळचा पाहुणा असो व इतर कोणी त्याला गावामध्ये प्रवेश दिला नाही. तसेच गावातील लोकांनासुद्धा गावाबाहेर जाण्यास मज्जाव केला. याचा परिणाम गाव कोरोनापासून दूर राहिले आहे.
गावात कोरोनाचा रुग्ण नसला तरी भविष्यात अजूनही कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक झाली. यामध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यास त्या रुग्णाला विलगीकरण होण्यासाठी केंद्र उभारणीसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. त्यानुसार आयसोलेशन सेंटर हे गावाच्या बाहेर असणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये उभारावे, असे ठरले. त्यासाठी सर्वांनी यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ खराडेचे पदाधिकारी यांची भेट घेतली. त्यांनीही केंद्र सुरू करण्यास परवानगी दिली. ते येत्या काही दिवसात पूर्ण होईल व रुग्णांच्या सेवेशी सज्ज होत आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी प्रत्येक गावाने कमीत कमी ३० बेडचे विलगीकरण केंद्र उभारावे, असे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत प्रातिनिधिक स्वरूपात १० बेडचे केंद्र उभारत आहोत. भविष्यात गरज भासल्यास अजून २० बेडचे केंद्र उभारण्याचे प्रस्तावित आहे.
चौकट-
खराडे येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी उभारलेल्या विलगीकरण केंद्राची हेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश देशमुख यांनी पाहणी करून ग्रामपंचायत व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. या सेंटरमध्ये शासनाच्यावतीने आरोग्य सुविधा, डॉक्टर, नर्स इत्यादी पुरविण्यात येणार असल्याने कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार व विलगीकरण करण्यासाठी उपयुक्त ठरेल.