परळी खोऱ्यात लावंघरला साकारतंय शिवस्मारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:46 IST2021-02-17T04:46:46+5:302021-02-17T04:46:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क परळी : छत्रपती शिवाजी महाराज अशी गर्जना केली तरी अंगात रक्त सळसळते. शिवाजी महाराजांचा इतिहास ज्वलंत ...

परळी खोऱ्यात लावंघरला साकारतंय शिवस्मारक
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी :
छत्रपती शिवाजी महाराज अशी गर्जना केली तरी अंगात रक्त सळसळते. शिवाजी महाराजांचा इतिहास ज्वलंत राहण्यासाठी महाराष्ट्रभर गडकिल्ले संवर्धनाचे काम अनेक मावळ्यांनी स्वयंस्फूर्तीने हाती घेतले आहे. गडकिल्ल्यांबरोबरच शिवाजी महाराजांचा अश्वारूढ असलेला पुतळा बसवण्याचे काम लावंघर या गावाने हाती घेतले आहे.
परळी खोऱ्यात होणाऱ्या या कामास परिसरातील वाड्या-वस्त्यांपासून सर्वांचीच साथ लाभत आहे. लावंघर येथील हे शिवस्मारक सुमारे ५० फूट उंच असून या स्मारकातील अश्वाची उंची १६ फूट आहे. असे हे भव्यदिव्य शिवस्मारक उभारण्यासाठी सुमारे १५ लाखांचा निधी अपेक्षित आहे. लावंघर गावातून या शिवकार्यासाठी घरटी जशी आपण यात्रेसाठी वर्गणी गोळा करतो अशा पद्धतीने प्रत्येक घरातून ५ हजार रुपये वर्गणी स्वखुशीने देण्यात आली आहे. आजमितीस शिवस्मारकाचे निम्म्याहून काम पूर्ण झाले असून शिवस्मारकाचा बुरुज, तटबंदी, अश्व बसविण्यात आला आहे. निधी संकलन करीत पुढील कामे सुरू आहेत.
लहानांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रेम, आदर आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगातून पायदळ, घोडदळ निर्माण करून छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या फौजेला नेस्तनाबूत केले. त्यांच्या या इतिहासाची प्रेरणा मिळावी, आपला इतिहास जागृत राहावा. गडकिल्ले आपण पुन्हा उभारू शकत नाही. मात्र, जे गडकिल्ले आहेत त्या किल्ल्याचं संवर्धन व्हावे, तरुणांना सह्याद्रीतील हे दुर्ग समजले पाहिजेत. या किल्ल्यांना भेटी दिल्या पाहिजेत, या उद्देशानेच हे शिवस्मारक उभरल्याची माहिती शिवस्मारक समितीच्या मावळ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
पाईंटर
शिवस्मारकाचे काम अंतिम टप्प्यावर
सज्जनगडच्या पायथ्याशी लावंघर येथे साकारतंय शिवस्मारक
सुमारे १५ लाखांचा खर्च अपेक्षित
लावंघर गावातून घरटी ५ हजार रुपये स्वेच्छेने देणगी
सुमारे ५० फूट उंच शिवस्मारक